अबब!... पालिका लावणार एक लाखाचा एक फलक
By admin | Published: December 24, 2014 01:36 AM2014-12-24T01:36:57+5:302014-12-24T01:36:57+5:30
महापालिकेच्या अंदाजपत्रकाच्या जमाखर्चाचा ताळमेळ बिघडला असल्याने या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात तब्बल १२00 कोटी रुपयांची तूट येणार आहे.
पुणे : महापालिकेच्या अंदाजपत्रकाच्या जमाखर्चाचा ताळमेळ बिघडला असल्याने या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात तब्बल १२00 कोटी रुपयांची तूट येणार आहे. त्यामुळे एकीकडे अंदाजपत्रकातील विकासकामांना ५० टक्के कात्री लावली असतानाच; दुसरीकडे मात्र, स्थायी समितीची उधळपट्टी सुरूच आहे. मंगळवारी झालेल्या समितीच्या बैठकीत शहरातील ५१ ऐतिहासिक वास्तूंच्या ठिकाणी प्रत्येकी एक माहितीफलक लावण्यासाठी तब्बल ५७ लाख रुपयांचा खर्चास मान्यता देण्यात आली. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाकडून ठेवण्यात आलेल्या या प्रस्तावात या वास्तूंच्या ठिकाणांचा साधा उल्लेख आणि फलक कसे असतील याची चार ओळींची माहिती नसतानाही, समितीने डोळे झाकून या प्रस्तावास मान्यता दिली असल्याचे दिसून आले. त्यामुळे या वास्तूंच्या ठिकाणी बसविला जाणारा प्रत्येक फलक महापालिकेस एक लाखास पडणार आहे.
ऐतिहासिक वारसा असलेल्या पुणे शहरात शनिवारवाडा, लाल महल, पांचाळेश्वर मंदिर, आगाखान पॅलेस, फुलेवाडा, टिळकवाडा यांसारख्या वास्तू आहेत. याशिवाय अनेक ऐतिहासिक वास्तूही आहेत. या ठिकाणी पर्यटकांनी भेट द्यावी, यासाठी महापालिकेकडून पुणे दर्शन ही बससेवाही सुरू करण्यात आली आहे. तर शहरातील काही मंदिरे आणि प्रमुख उद्यानेही असून, त्या ठिकाणी भेट देण्यासाठी वर्षभर पर्यटक शहराला भेटी देत असतात, या ठिकाणांची माहिती पर्यटकांना मिळावी तसेच त्या वास्तूंची माहिती संक्षिप्त स्वरूपात असावी यासाठी सुमारे ५७ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव भवन रचना विभागाकडून स्थायी समितीसमोर आयत्या वेळी ठेवण्यात आला होता. त्यास कोणतीही स्पष्ट स्वरूपातील माहिती नव्हती. असे असतानाही, समितीने केवळ या हेरिटेज वास्तू आहेत, म्हणून त्यास मान्यता दिली.