‘पुण्यदशम’च्या प्रवासासाठी आधार कार्डची अट रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:12 AM2021-09-22T04:12:38+5:302021-09-22T04:12:38+5:30
पुणे : पीएमपीएलच्या ‘पुण्यदशम’ बससेवेचा लाभ घेण्यासाठी लागू करण्यात आलेली आधार कार्डची अट रद्द करण्याची मागणी ...
पुणे : पीएमपीएलच्या ‘पुण्यदशम’ बससेवेचा लाभ घेण्यासाठी लागू करण्यात आलेली आधार कार्डची अट रद्द करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी मंगळवारी मुख्य सभेत केली. त्यावर यासंदर्भात लवकरच पीएमपी प्रशासनाला आदेश दिले जातील, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
महापालिकेने नागरिकांनी खासगी वाहने वापरणे कमी करून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, वाहतूक कोंडी कमी करावी आणि नागरिकांना कमी पैशात प्रवास करता यावा, यासाठी पीएमपीएलच्या सहकार्याने मध्यवर्ती शहरात १० रुपयांत दिवसभर प्रवास ही योजना सुरू केली आहे. ''पुण्यदशम'' नावाने तीन महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या या योजनेसाठी ५० एसी मिनी बसेस खरेदी केल्या आहेत. मध्यवर्ती शहरात १० रुपयांमध्ये दिवसभर प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. मात्र हा प्रवास करताना आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. आधारकार्ड नंबर दिल्यानंतरच तिकीट दिले जाते, अन्यथा बसमधून उतरवण्यात येते. त्याबाबत सातत्याने शिवसेनेने आवाज उठविला आहे. सर्वसाधारण सभेत पीएमपीएलच्या प्रस्ताव चर्चला आला असताना शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी प्रवासादरम्यान आधारकार्डचे बंधन काढून टाकावे, अशी मागणी केली. नागरिकांना सुविधा देताना बंधने का लादताय? असा प्रश्न उपस्थित केला. यावर सुरुवातीला स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि नंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात पीएमपी प्रशासनासोबत चर्चा झाली आहे. आधारकार्डचे बंधन काढून टाकावे याबाबत त्यांना आदेश देण्यात येतील, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले.