आधार केंद्र येणार सरकारी जागेत : सरकारचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 08:27 PM2018-11-21T20:27:55+5:302018-11-21T20:30:58+5:30
तक्रारी वाढल्याने खासगी जागेतील आपले सेवा केंद्रातील सर्व आधार केंद्र सरकारी जागेत स्थलांतरीत केले जाणार आहेत.
पुणे : आधार कार्ड काढण्यासाठी अथवा त्यातील चुकीची दुरुस्ती करण्यासाठी अतिरिक्त शुल्क वसुल केले जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने खासगी जागेतील आपले सेवा केंद्रातील सर्व आधार केंद्र सरकारी जागेत स्थलांतरीत केले जाणार आहेत. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने केंद्र स्थलांतराचे आदेश महाआॅनलाईनला दिले आहेत.
आधार चालकांनी आपली आधार यंत्रे आणि यंत्रचालकांचे शासकीय जागेत स्थलांतर करावे, त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे. आपले सरकार सेवा केंद्रांमधील यंत्रचालकांना जिल्हा प्रशासनाकडून सरकारी जागा सुचवण्यात येणार असून त्या जागेमध्ये संबंधित आधार यंत्रचालकांना आधारचे काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे केंद्रचालक शासकीय जागेत स्थलांतर करणार नाहीत, अशा आधार यंत्रचालकांकडून आधारची कामे काढून घेण्यात येणार आहेत. या पूर्वी काळ्या यादीत टाकलेले आधार यंत्रचालक आणि सरकारी जागेत स्थलांतर करण्यास नकार देणाऱ्या यंत्र चालकांकडील आधार यंत्रे तत्काळ जिल्हा प्रशासनाकडे जमा केली जातील.
सद्य:स्थितीत ज्या आधार केंद्र चालकांकडे माहिती तंत्रज्ञान विभागाची आधार यंत्रे आहेत परंतु, त्यांचा आधार नोंदणीसाठी वापर करण्यात येत नाही, अशी सर्व आधार यंत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात येणार आहेत. ही यंत्रे जमा न केल्यास शासकीय मालमत्ता अनधिकृतपणे जवळ बाळगल्याप्रकरणी संबंधित केंद्र्र चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.