आधारकार्ड फेरदुरुस्तीचे काम झाले ठप्प; नागरिकांना अडचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 02:04 AM2019-02-01T02:04:42+5:302019-02-01T02:04:59+5:30
शासकीय कामे अडली, बँक आणि रेशनिंग कार्डवरही परिणाम
मंचर : मंचर येथील आधारकार्ड काढण्याचे आणि फेरदुरुस्ती करण्याचे काम सध्या ठप्प असल्याने नागरिकांना शासकीय कामे करण्यात अनेक अडचणी येत आहेत. रेशनिंगकार्डसाठी आधारकार्ड व्हेरिफिकेशन करणे काम सुुरु आहे. त्यासाठी आधारकार्ड सक्तीचे आहे. मात्र मंचर पोस्ट आॅफीसमधील आधारकार्ड काढण्याचे काम ठप्प असल्याने नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे. शेकडो नागरीक आधारकार्डसाठी दररोज पोस्ट आॅॅफीसमध्ये फेऱ्या मारत असून त्यांना रिकाम्या हाताने मागे फिरावे लागते.
स्टेट बॅकेमध्ये आधारकार्ड काढण्यासाठी भल्या थंडीत पहाटे साडेतीन वाजता अनेकजण रांगा लावत आहेत. आधारकार्ड काढण्याचे काम बंद असल्याने नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आंबेगाव तालुक्यात घोडेगाव व मंचर येथील पोस्ट कार्यालय तसेच स्टेट बँकेमध्ये आधारकार्ड काढून दिले जाते. मात्र मंचर पोस्ट आॅफीसमध्ये आधारकार्ड काढण्याचे काम तांत्रिक अडचणीमुळे १० जानेवारी पासून आधारकार्ड काढणे बंद आहे. सध्या रेशनिंग कार्ड साठी आधार व्हेरिफिकेशन सुरु आहे. त्यासाठी नागरीकांना रेशनिंग दुकानात जावे लागते.
आधारकार्ड व्हेरिफिकेशन करताना अनेक अडचणी उभ्या राहत आहेत. नागरीकांचे ठसे मॅच होत नाहीत. विशेषत लहान मुले व वृद्ध नागरीकांचे ठसे मॅच होत नसल्याने ते आधारकार्ड काढण्यासाठी पोस्टात धाव घेतात. त्यावेळी नेट प्रॉब्लेम आहे असे सांगून नागरीकांची बोळवण केली जाते. दररोज शेकडो नागरीक पोस्ट आॅफीसमध्ये हेलपाटे मारुन माघारी निघुन जात आहेत. स्टेट बँकेत आधारकार्ड काढण्याचे काम केले जाते मात्र तेथे दिवसाला केवळ १५ नागरीकांचेच आधारकार्ड काढले जात असल्याचे सांगितले जाते. अनेक नागरीक नंबर लागावा यासाठी पहाटे रांगा लावत असल्याचे दिसत आहे. एका व्यक्तीने पहाटे ५ वाजता नंबर लावूनही त्याला मागे फिरावे लागले.
रेशनिंगसाठी आधार व्हेरिफिकेशन करण्याची शेवटची तारीख २९ होती मात्र आता ८ दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक नागरीकांना चार-चार वेळा ठसे देवूनही ते मॅच होत नसल्याने माघारी फिरावे लागत आहे. जर रेशनिंगकार्ड आधारकार्डबरोबर व्हेरिफिकेशन झाले नाही तर रेशनिंग बंद होण्याची भिती असून त्याचा फटंका सर्वसामान्य नागरीकांना बसणार आहे. १०० मधील केवळ ७० लोकांचेच आधार व्हेरिफिकेशन होत असून ३० नागरीक वंचित राहत आहेत. मंचर येथील पोस्ट आॅफीसमधील आधारकार्ड काढण्याचे काम तातडीने सुरु करावे अशी मागणी शिवउद्योग सहकार सेनेचे तालुका अध्यक्ष सागर प्रकाश काजळे यांनी केली आहे.
तांत्रिक अडचण असल्याने १० तारखेपासून आधारकार्ड काढणे काम बंद आहे. घोडेगाव, आळे, मंचर येथील पोस्ट आॅफीसमधील आधारकार्ड काढण्याचे काम सध्या बंद आहे. १० फेबु्रुवारीला हे काम सुरु होण्याची शक्यता आहे. नागरीक चौकशीसाठी मोठ्या संख्येने येत असून त्यांना आम्हाला उत्तर द्यावे लागत आहे. आधारकार्ड काढण्याची यंत्रणा सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत.
- डी. पी. सैद, पोस्टमास्तर, मंचर
सर्वांनी आपआपले आधार व्हेरिफिकेशन करुन घ्यावे धान्य देताना कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. एका व्यक्तीचे व्हेरिफिकेशन झाले तरी त्या कुटुंबाला धान्य मिळणार आहे. मात्र, तरीही सर्वांनी संपूर्ण कुटुंबियांचे आधार व्हेरिफि केशन करुन घ्यावे त्यामुळे त्रुटी कमी होतील व नागरीकांचा हेलपाटा वाचेल. जेथे आधार मशिन उपलब्ध आहेत तेथे काम करुन घ्यावे.
- सुषमा पैकीकरी, तहसीलदार आंबेगाव