शिबिरात ३० तृतीयपंथी नागरिकांना दिले ‘आधार’ कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:12 AM2021-02-13T04:12:55+5:302021-02-13T04:12:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र शासनाने देशातील प्रत्येक नागरिकांना स्वत: ची ओळख देण्यासाठी यूआयडी क्रमांकासह आधार कार्ड प्रदान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्र शासनाने देशातील प्रत्येक नागरिकांना स्वत: ची ओळख देण्यासाठी यूआयडी क्रमांकासह आधार कार्ड प्रदान केले आहे. सध्या सर्व शासकीय कामांसाठी व विविध ठिकाणी पुरावा म्हणून आधार ग्राह्य धरले जाते. परंतु, आजही समाजातील काही घटक यापासून वंचित आहेत. यासाठी तृतीयपंथी नागरिकांना आधार कार्ड देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने खास शिबिर घेण्यात आले. या शिबिरात पुणे शहरातील ३० तृतीयपंथी नागरिकांना आधार कार्ड वाटप करण्यात आले. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे यांनी सांगितले.
आखाडे यांनी सांगितले की, विभागीय आयुक्त सौरभ राव व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार तृतीयपंथी नागरीकांसाठी राज्यामध्ये प्रथमच विशेष आधार नोंदणी शिबिराचे आयोजन केले. महापालिकेच्या हडपसर क्षेत्रिय कार्यालयामध्ये नुकतेच हे शिबिर घेण्यात आले.
पुणेरी प्राईड फाऊंडेशन यांनी तृतीयपंथी नागरीकांना आधार कार्ड मिळणेकामी जिल्हा प्रशासनाकडे विनंती अर्ज केला होता. हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे यांनी सदर शिबीरासाठी विशेष सहकार्य केले. अशा प्रकारचे विशेष आधार नोंदणी शिबिर घेणेची ही राज्यातील पहिलीच वेळ असलेने या विशेष आधार नोंदणी शिबीराची दखल भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण,प्रादेशिक कार्यालय मुबई. या कार्यालयाकडून घेणेत आली. सदर आधार शिबीरामध्ये ३० तृतीयपंथीयांनी आधार नोंदणी केली. यावेळी तहसीलदार राधिका हावळ, प्रकल्प व्यवस्थापक चतुर्थी मोगरे उपस्थित होते.