आई..आई...अशी हाक ऐकण्यासाठी कधीपासून आसुसलेली पण "कर्तव्य" मह्त्वाचं...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 10:00 PM2020-05-05T22:00:00+5:302020-05-05T22:00:02+5:30
आई तर दिसते पण ती जवळ का घेत नाही असा प्रश्न तान्हुलीला पडतो. मग तिच्या आर्त हाका सुरू होतात....
नम्रता फडणीस
पुणे : कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये मुलीच्या दुराव्याने त्या माऊलीचे काळीज गलबलते. असा एकही दिवस जात नाही की तिच्या डोळ्यात चिमुकलीच्या आठवणीने पाणी येत नाही. मुलीला हातात घेण्यासाठी, आई आई अशी हाक ऐकण्यासाठी ती कधीपासून आसुसलेली आहे. पण काय करणार? तिच्या मातृप्रेमाच्या आड कर्तव्य आलं आहे. पुणे शहर तहसील कार्यक्षेत्रातील पर्वती विभागाच्या तलाठी प्रज्ञा बोरगावकर पंडित यांची ही हदय पिळवून टाकणारी कहाणी नि:शब्द करणारी आहे.
माहेरी इचलकरंजीला त्यांची सव्वा वर्षांची चिमुकली संहिता आणि त्या पुण्यात. त्या रोज मुलीला भेटतात, बघतात पण तेही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून. आई तर दिसते पण आई जवळ का घेत नाही असा प्रश्न तान्हुलीला पडतो. मग तिच्या आर्त हाका सुरू होतात आई, आई. ती हाक ऐकल्यानंतर त्यांच हदय भरून येतं. त्यामुळे त्या आता तिच्या समोर जाणचं टाळतात. व्हिडिओ कॉल सुरू झाला की तिला डोळे भरून लांबूनच बघतात आणि मग अश्रूंना पान्हा फुटतो. सध्या आपल्या मुलींची सुंदर चित्र रेखाटूनच त्या मातृत्व अनुभवत आहेत. तिच्या आठवणीने व्याकूळ होताना तिच्याविषयीचे शब्द नकळतपणे कागदावर उमटतात आणि अश्रूंचे मोती निश्चलपणे रेषांवर विसावतात अशी त्यांची अवस्था झाली आहे.
गेल्या दोन महिन्यापासून कर्तव्यदक्षतेमुळे मुलीपासून दूर राहावे लागलेल्या या आईला आता तिच्याकडे जाण्याची ओढ लागली आहे. मात्र इच्छा असूनही जाता येत नाही अशी स्थिती आहे. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. दिवसरात्र काम करावे लागत आहे. परंतु मुलीला भेटण्यासाठी त्यांच्या पतीने संबंधित कार्यालयांशी मेलद्वारे पत्रव्यवहार केला आहे. त्या पत्राच्या उत्तराकडे त्यांचे चातकासारखे डोळे लागले आहेत. आपल्या मुलीबद्दल 'लोकमत'शी साधलेल्या मनमोकळया संवादातून एका आईची ही करूण कहाणी काहीशी अस्वस्थ करून गेली.
त्या म्हणाल्या, मी 8 व 9 मार्चला मुलीला घेऊन इचलकरंजीला माहेरी गेले होते. तेव्हा आम्हाला फोन आला की 9 मार्चला पुण्यात दोन कोरोनाचे रूग्ण सापड्ले आहेत. हा संसर्गजन्य रोग असल्याचे ऐकले होते. म्हणून मग मुलीला तिथेच आठ दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला आणि एकटीच पुण्याला आले. पण नंतर रूग्ण वाढायला लागले आणि 22 मार्चला लॉक डाऊन जाहीर झाला. आमचे काम देखील वाढले. त्यामुळे मुलीला घ्यायला जाताच आले नाही. यापूर्वी देखील जेव्हा
25 सप्टेंबर 2019 ला पुण्यात महापूर आला होता. तेव्हा मी नुकतीच जॉईन झाले होते. मुलगी फक्त आठ महिन्यांची होती. माझ्याकडे कामाचा लोड असल्याने तिच्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते. मात्र तेव्हा किमान ती जवळ होती. आता दोन महिने झाले तिच्यापासून दूर आहे. तिला भेटण्याची ओढ लागली आहे. यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला आहे. पण अजून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही.
-----------------------------------------------------------