आमदार महेश लांडगेंपुढे नांगी टाकली आढळरावांनी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 03:16 PM2019-03-29T15:16:04+5:302019-03-29T15:23:41+5:30
शिरूर लोकसभा मतदारसंघ भाजपाला मिळावा, अशी मागणी भोसरीचे भाजपा सहयोगी आमदार महेश लांडगे आणि समर्थकांनी केली होती.
पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या वेस्ट टू एनर्जी आणि समाविष्ट गावांतील विकासकामे यांवर गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे भाजपाची युती होऊनही भोसरीतील भाजपा आढळरावांच्या प्रचारात सहभागी झाली नव्हती. लांडगे आणि आढळरावांतील दुरावा दूर करण्यासाठी बैठक झाली. आढळरावांनी लांडगेंपुढे हात टेकले असून, गैरव्यवहाराचे आरोप मागे घेण्यात येणार असल्याचे गुप्त बैठकीत सांगितले. आढळरावांनी टाकलेल्या नांगीची चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघात आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघ भाजपाला मिळावा, अशी मागणी भोसरीचे भाजपा सहयोगी आमदार महेश लांडगे आणि समर्थकांनी केली होती. जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेला गेला आणि विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांना उमेदवारी मिळाली. तर युतीबाबत झालेल्या बैठकीत आमदार लांडगे सहभागी झाले होते. मात्र, प्रचारात न सहभागी होण्याचे धोरण भाजपा नगरसेवकांनी स्वीकारले होते. तसेच नगरसेवकांबरोबर बैठकीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आढळराव हे लांडगे यांच्या कार्यालयात पोहोचले. त्यानंतर बैठक झाली. या वेळी भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, बाळासाहेब गव्हाणे, सारंग कामतेकर, विजय फुगे, संजय गायकवाड, महादेव गव्हाणे उपस्थित होते.
या वेळी आढळराव यांनी आपले मत मांडले. गेल्या साडेचार वर्षांत भोसरीतील विविध विकासकामांबाबत केलेले आरोप आणि दिलेली पत्रे मागे घ्यावीत, रस्तेविकास, वेस्ट टू एनर्जी बाबत आरोप केले. हे सर्व आरोप आणि याबाबतची पत्रे मागे घ्यावीत, अशी मागणी केली. त्यावर आरोप आणि पत्रे माघार घेणार असल्याचे आढळराव यांनी सांगितले. चार वर्षांत झालेले आरोप-प्रत्यारोप अनावधानाने झाले आहेत. त्यामुळे झाले ते झाले. यापुढे असे होणार नाही, असेही आढळराव यांनी सांगितल्याचे बैठकीतील सूत्रांनी सांगितले.
................
शिष्टमंडळ भेटणार
शिवसेना-भाजपाच्या २००८ च्या विधानसभा निवडणुकीत लढविलेल्या युतीच्या फॉर्म्युल्यानुसार भोसरी मतदारसंघ शिवसेनेकडे होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भोसरी भाजपाला सोडण्याची मागणी बैठकीत केली. याबाबत येत्या दोन दिवसांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट शिष्टमंडळ घेणार असून, त्यामध्ये खासदारांसह भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार शरद सोनवणे आणि महेश लांडगे असणार आहेत.