अंगणवाडी सेविकाही महापालिकेच्या विरोधात आंदोलनाच्या पावित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 05:04 PM2018-08-06T17:04:27+5:302018-08-06T17:41:41+5:30
प्राथमिक शिक्षकांपेक्षा कामाची वेळ फक्त एका तासाने व ती ही कागदोपत्री कमी असल्याने त्यांची सेवा अर्धवेळ समजली जाते.
पुणे : महापालिकेच्या अंगणवाडी शिक्षिका व सेविकांमध्ये अपुऱ्या वेतनावरून असंतोष निर्माण झाला आहे. प्राथमिक शिक्षकांपेक्षा कामाची वेळ फक्त एका तासाने व ती ही कागदोपत्री कमी असल्याने त्यांची सेवा अर्धवेळ समजली जाते. तरीही अन्य महापालिकांमधील शिक्षिका व अंगणवाडी सेविकांपेक्षा कमी वेतनावर त्यांना काम करावे लागत आहे.
शहरातील विविध वसाहतींमध्ये महापालिकेच्या अंगणवाड्या आहेत. मराठी, इंग्रजी, कन्नड अशा विविध भाषांमध्ये त्या चालवल्या जातात. एकूण ३१२ अंगणवाड्यांमध्ये ९३८ शिक्षिका व सेविका आहेत. मराठी माध्यमात २५५ शिक्षिका व २४२ सेविका आहेत. इंग्रजीसाठी १७५ शिक्षिका व १६८ सेविका आहेत. उर्दुसाठी ६२ शिक्षिका व १२ सेविका तर कन्नडसाठी १ शिक्षिका व १ सेविका आहे. बहुसंख्य अंगणवाड्या शहरातील वेगवेगळ्या वसाहतींमध्ये आहेत. त्यात येणारी मुले कष्टकरी, ज्यांचे आईवडिल दोघेही काम करतात अशा घरांमधील आहेत. शिक्षिका व सेविका अशा दोघांनाही या मुलांसाठी बराच वेळ द्यावा लागतो. वेळप्रसंगी मुले आली नाहीत तर त्यांच्या घरी जाऊन त्यांना आणावे लागते, त्यांची देखभाल करावी लागते.
त्यासाठी महापालिकेकडून शिक्षिकांना ८ हजार ५०० तर सेविकांना ६ हजार २०० असे वेतन दिले जाते. त्यात वाढ व्हावी अशी त्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यापूर्वी अंगणवाड्यांचे कामकाज शिक्षण मंडळाकडून चालत होते. सन २०१७ मध्ये शिक्षण मंडळ विसर्जित करण्यात आले. त्यामुळे आता थेट महापालिकेकडून अंगणवाड्यांचे काम पाहिले जाते. पूर्वी मंडळाकडून मागण्यांची किमान दखल घेतली जात असे, आता मात्र महापालिका प्रशासन काहीच ऐकायला तयार नाही असे संघटनेचे म्हणणे आहे. महापालिका युनियनच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका प्रशासनाबरोबर संपर्क साधत असतात, मात्र त्यांची दखल घेतली जात नाही अशी त्यांची तक्रार आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या कामाची वेळ ६ तास आहे तर अंगणवाडी शिक्षिका व सेविका यांच्या कामाची वेळ ५ तास आहे. त्यामुळे त्यांना अर्ध वेळ समजले जाते व कमी वेतनावर भरपूर काम करून घेतले जाते. वसाहतींमधील मुलांना शोधणे, त्यांना अंगणवाडीत आणून बसवणे, शिकवणे त्याशिवाय वेळोवेळी महापालिका प्रशासनाने सांगितलेली जनगणना व निवडणुकविषयक कामे करणे ही जबाबदारी त्यांना पार पाडावी लागते. त्यामध्ये ५ तासांपेक्षा कितीजरी जास्त वेळ जातो. राज्यातील ठाणे, मिराभाईंदर, खोपोली, इचलकरंजी याठिकाणी बालवाडी शिक्षिका व सेविका यांना वेतनश्रेणी दिली जाते. नवी मुंबई, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ११००० ते १५००० हजार रुपये मानधन दिले जाते अशी माहिती काही अंगणवाडी सेविकांनी दिली. त्याप्रमाणे वेतन मिळावे, अशी शिक्षिका व सेविका यांची मागणी आहे.