VIDEO: पुणे महापालिका आयुक्तांच्या गाडीवर ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी चिकटवले सॅनिटरी नॅपकिन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 02:51 PM2024-02-02T14:51:02+5:302024-02-02T14:51:54+5:30
या प्रकारानंतर ‘आप’च्या १६ पदाधिकारी-कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
पुणे : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींसाठीच्या सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठीच्या निविदा मिळण्यासाठी भाजपच्या आमदार-खासदारांमध्ये सुरू असलेल्या चढाओढीवर काँग्रेसने आणि आम आदमी पक्षाने बुधवारी आरोप केले. त्यानंतर आपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या शासकीय वाहनावर सॅनिटरी नॅपकिन चिकटवून निषेध नोंदवला. या प्रकारानंतर ‘आप’च्या १६ पदाधिकारी-कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सॅनिटरी नॅपकिन निविदा प्रक्रियेत भाजपच्या आमदार व खासदाराने त्यांच्या मर्जीतील ठेकेदाराला कंत्राट देण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप काँग्रेस आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता.
दरम्यान, महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींना त्वरित सॅनिटरी नॅपकिन वाटले जावेत, अशी मागणी करण्यासाठी ‘आप’चे पदाधिकारी, कार्यकर्ते गुरुवारी (ता. १) महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी महापालिकेच्या आवारातील पार्किंगमध्ये असलेल्या आयुक्तांच्या गाडीवर सॅनिटरी नॅपकिन चिटकवून या घटनेचा निषेध व्यक्त केला. या घटनेनंतर, शिवाजीनगर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी महापालिकेच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख राकेश विटकर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर रात्री उशिरा १६ आंदोलनकर्त्यांविरोधात सरकारी मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली.