आर्त स्वर भिडले अंतरंगी..लागली समाधी आनंदांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:29 PM2018-03-23T22:29:36+5:302018-03-23T22:29:36+5:30
लोकमत सखी मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा संस्थापक-अध्यक्ष आणि संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्नाभाभी दर्डा यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त ‘भजनसंध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पुणे : श्रद्धा,साधना आणि भक्तिरसाला लाभलेली स्वरांची श्रवणीय साथ..हे सुरांचे देणे म्हणजे जणू ईश्वरी अनुभूतीच. या हदयाला भिडलेल्या अभिजात स्वरांनी रसिकांना समाधीवस्थेत नेले. उपस्थितांना एका स्वर्गीय आनंदाची साक्षानुभूती दिली. प्रसिद्ध युवा गायिका मंजुषा कुलकर्णी-पाटील यांच्या भारदस्त स्वरांनी अवघा आसमंत भक्तिरसात न्हाऊन गेला.
या अविस्मरणीय सोहळ््याला निमित्त होते...लोकमत सखी मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा संस्थापक-अध्यक्ष आणि संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्नाभाभी दर्डा यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘भजनसंध्या’ या कार्यक्रमाचे. या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्योत्स्ना दर्डा यांच्या भगिनी सुशीलाभाभी बंब,सखी मंचाच्या माजी समन्वयक विमल दर्डा, अरूणा गटागट, संजीवनी उन्हाळे, सुनंदा दीक्षित आणि गायिका मंजुषा पाटील यांच्या उपस्थितीत दीप्रज्वलनाने झाले.
भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात ग्वाल्हेर घराण्याच्या युवा गायिका मंजुषा कुलकर्णी-पाटील यांचे नाव ख्याल गायकीसाठी प्रसिद्ध आहे. स्वरांमधील त्यांची स्पष्टता, भारदस्तपणा, अभिजात कंठ गायकी या त्यांच्या गानवैशिष्ट्यांमुळे त्यांच्या मैफिलीमधून रसिकांना श्रवणानंदाचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. काल पुनश्च: त्याचीच प्रचिती आली. व्यासपीठावर या युवा गायिकेचे आगमन होताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र,जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र या रचनेने कार्यक्रमाची नांदी करत मंजुषा कुलकर्णी यांनी भक्तिमय वातावरणाची निर्मिती केली. जय जय रामकृष्ण हरीचे स्वर आसमंतात निनादू लागले आणि रसिकांना ब्रम्हानंदी टाळी लागली.त्यानंतर रूप पाहाता लोचनी अवघे पंढरपूर, पालखीच्या संगे मन माझे धावे अबीर गुलाल उधळीत रंग आणि देवा पांडुरंगा अशा भक्तिरचनांनी कळसाध्याय गाठला आणि त्या स्वरांमध्ये रसिक एकरूप झाले. जोहार मायबाप या भक्तिरचनेने रसिकांना जिंकले. या कार्यक्रमात मंजूषा कुलकर्णी-पाटील यांना राहुल गोळे (हार्मोनिअम), रोहित मुजूमदार (तबलावादक), प्रसाद भांडवलकर (टाळ) यांनी साथसंगत केली.
----------------------------------------------------------
ज्योत्स्नाचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रेमळ आणि उत्साही होते. संगीताची तिला विशेष आवड होती. तिने संगीताच्या परीक्षाही दिल्या होत्या. घराचा
उंबरठा न ओलांडलेल्या सखींना तिने मुक्त अवकाश मिळवून दिले. आयुष्यातून व्यक्ती निघून जातात. पण आपल्या बहुमूल्य कायार्तून त्या कायम स्मरणात राहतात- सुशीलाभाभी बंब, भगिनी
----------------------------------------------------------