Hanuman Jayanti: पुण्यात मुस्लिम बांधवांकडून मारुतीरायाची आरती; राष्ट्रवादीची सर्वधर्मीय हनुमान जयंती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 05:40 PM2022-04-15T17:40:02+5:302022-04-15T17:41:04+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार
पुणे : पुण्यात हनुमानाची असंख्य मंदिरे आहेत. अनेक मंदिरांना पेशवेकालीन इतिहासही आहे. उद्या तब्बल दोन वर्षांनंतर देशभरात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. पुण्यातही पक्ष, संघटना, संस्था, मंडळे यांच्या वतीने जयंती जल्लोषात साजरी केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिर यांच्या वतीने हिंदूंकडून मुस्लिमांचा रोजा इफ्तार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सायंकाळी हा कार्यक्रम होणार आहे. तर उद्या पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्वधर्मीय हनुमान जयंती व रोजा इफ्तार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी आयोजित कार्यक्रमात सर्व मुस्लिम बांधवांकडून हनुमान जयंतीनिमित्त मारुतीरायाची आरती करण्यात येणार आहे. तर हिंदू बांधवांतर्फे मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती
पुण्यात सदाशिव पेठेतील कुमठेकर रस्त्यावरील प्रसिद्ध खालकर मारुती मंदिरात राज ठाकरे यांच्या हस्ते हनुमान जयंतीनिमित्त मारुतीच्या पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. खालकर चौक मारुती मंदिरच्या कार्यक्रमाला ठाकरे हनुमान जयंतीला (शनिवार) पुण्यात उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता मारुतीची महाआरती आयोजित करण्यात आली आहे. त्याच वेळी हनुमान चालिसा पठणही होणार आहे.