आरतीचा तास, देऊया सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:16 AM2021-09-17T04:16:18+5:302021-09-17T04:16:18+5:30
‘लोकमत’च्या वतीने आयोजिण्यात आलेला ‘आरतीचा तास’ हा उपक्रम स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीला बळकटी देत आहे. यामुळे समानतेच्या धोरणाची पाळेमुळे समाजात ...
‘लोकमत’च्या वतीने आयोजिण्यात आलेला ‘आरतीचा तास’ हा उपक्रम स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीला बळकटी देत आहे. यामुळे समानतेच्या धोरणाची पाळेमुळे समाजात खोलवर रुजण्यास मदत होणार आहे.
पुरुषांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या ‘ती’लाच गणेशोत्सवात स्थान मिळत नाही. ‘ती’च्या अस्तित्वाचा सन्मान होत नाही. ‘ती’च्या हातात, आरतीचे ताट आले तर आत्मसन्मानाची भावना जागृत होईल, हा यामागचा उद्देश आहे. तसेच गणरायाची आरती करणारी स्त्री, तिच्या अवतीभोवतीच्या प्रत्येक पुरुषाइतकीच सक्षम आणि कर्तृत्ववान असल्याचा संदेश यातून जाईल. लोकमतच्या ‘ती’च्या आरतीच्या अभिनव उपक्रमामधून परिवर्तनाची नवी पहाट उगवेल याचा आम्हाला विश्वास आहे. विविध सार्वजनिक मंडळांबरोबरच घरोघरीही हा उपक्रम साजरा व्हावा. आई, बहीण, पत्नी, लेकीच्या हस्ते आरती करून या सर्व पुणेकरांनी स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन ‘लोकमत’ करत आहे. लक्षात ठेवा...स्त्री ही जगाची जननी आहे. सन्मान, प्रतिष्ठा, समानता हा ‘ती’चा हक्क आहे.
लोकमत ‘ती’चा गणपती ही अभिनव चळवळ आठ वर्षांपूर्वी सुरू झाली, तीच मुळी स्त्रीचा सन्मान, ‘ती’ची प्रतिष्ठा समाजाने मान्य करावी म्हणून. सन्मान हा मागून द्यायची गोष्ट नाही. शेतापासून अंतराळापर्यंत आणि घरापासून पंतप्रधानपदापर्यंत प्रत्येक ठिकाणी स्त्री-पुरुषांच्या बरोबरीने कर्तृत्व गाजवत आली आहे. तिच्या ठायीच्या सामर्थ्याबद्दल कृतज्ञता, आदरभाव बाळगून आज पेठापेठांमध्ये, घराघरात ‘आरतीचा तास’ संकल्पना मनापासून, आनंदाने साजरी करूयात. गणपती बाप्पा मोरया.