Aashadhi Wari: संत गोरोबा काका पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 07:51 PM2023-06-14T19:51:32+5:302023-06-14T19:52:00+5:30
आषाढी वारीचे औचित्य साधून भोर, वेल्हा तालुक्यातील संत गोरोबा काका पालखीचे प्रस्थान आज पंढरपूरकडे झाले...
नसरापूर (पुणे) : महाराष्ट्रातला सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो. आषाढी वारीचे औचित्य साधून भोर, वेल्हा तालुक्यातील संत गोरोबा काका पालखीचे प्रस्थान आज पंढरपूरकडे झाले. यावेळी नसरापूर - माळेगाव येथील ज्ञानप्रकाश शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विजय आठवले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नसरापूर येथे पालखीचे स्वागत केले.
या पालखी सोहळ्यात आठवलेचे विद्यालयाचे ' चिमुकले वारकरी वेशात 'या सोहळ्यात सहभागी झाले होते. या पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण वि नेद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत मुक्ताई, संत मीरा या संतांच्या वेशभूषा केल्या होत्या. त्यांनी उपस्थित पालक, ग्रामस्थ यांचे लक्ष वेधले. वारकरी वेशात टाळ, मृदंग, वीणा, पताका, डोक्यावर तुळस घेऊन पालखी सोहळ्यात उत्साहात सहभागी झाले होते.
शिवस्पर्शाने पावन झालेल्या व स्वराज्याची पहिली राजधानी राहिलेल्या किल्ले राजगडाच्या पायथ्यापासून संत गोरोबा काका पालखीचे प्रस्थान करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यात नसरापूरपासून वेल्हा परिसरातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यात प्रामुख्याने महिलांची संख्या उल्लेखनीय होती. नसरापूर (ता.भोर)येथे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नसरापूर बाजारपेठेतून पालखी सोहळा प्रस्थान करीत असताना नसरापूर गावातील तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वारीतील सहभागी वारकऱ्यांना फराळाचे वाटप करीत वारीच्या प्रवासात असणाऱ्या आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.