Aashadhi Wari: वारीचं वय होतंय तरुण, दिंड्यांमधील तरुणांची संख्या वाढली; आत्मिक समाधान हीच ओढ

By नितीन चौधरी | Published: June 14, 2023 04:29 PM2023-06-14T16:29:36+5:302023-06-14T16:30:54+5:30

कोरोना कालखंडापूर्वीच्या गेल्या काही वर्षांचा अभ्यास केला असता वारीतून मार्गक्रमण करणाऱ्या तरुण वारकऱ्यांची संख्या वाढत आहे...

Aashadhi Wari 2023 is getting young number of youth in Dindis increased; Spiritual satisfaction attraction | Aashadhi Wari: वारीचं वय होतंय तरुण, दिंड्यांमधील तरुणांची संख्या वाढली; आत्मिक समाधान हीच ओढ

Aashadhi Wari: वारीचं वय होतंय तरुण, दिंड्यांमधील तरुणांची संख्या वाढली; आत्मिक समाधान हीच ओढ

googlenewsNext

पुणे : 'तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात' कीर्तनातून सहभागी होणारा तरुण हा खऱ्या अर्थाने समाजात उठून दिसतो. याच उक्तीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आता तरुणाई उठून दिसत आहे. गेल्या काही वर्षांचे चित्र बघता तरुणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन जीवनात असलेला ताण तणाव चिंता दूर करण्यासाठीच विठ्ठलाचे नामस्मरण हेच जीवनाचे सार असल्याचं या वारीत सहभागी होणाऱ्या तरुण वारकऱ्यांचं मत आहे. तरुणांची ही संख्या सध्या तीस ते पस्तीस टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे वारी ही ज्येष्ठांची आहे असा समज आता दूर होत आहे. हाच तरुण आता वैष्णवांची ही पताका सामर्थ्याने खांद्यावर घेऊन विठ्ठलाची आस धरतोय.

कोरोना कालखंडापूर्वीच्या गेल्या काही वर्षांचा अभ्यास केला असता वारीतून मार्गक्रमण करणाऱ्या तरुण वारकऱ्यांची संख्या वाढत आहे. वाडवडिलांची परंपरा पुढे सांभाळणाऱ्या तरुणांपेक्षाही वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी असलेल्या मात्र कुटुंबातील सदस्यांनी वारी केलेली नसली तरी आपण मात्र अखंड वारी करायची असा ध्यासच काही तरुणांनी घेतला आहे. त्यात विशेषतः विदर्भ मराठवाड्यातील सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणांची संख्या जास्त आहे. बदनापूर (जिल्हा जालना) येथील कार्तिक एखंडे हे याचे उत्तम उदाहरण आहे.

कार्तिकला पंधराव्या वर्षीच आळंदीच्या माऊलींची ओढ लागली आणि हा तरुण वारकरी आळंदीतच स्थिरावला. गावाकडं अधूनमधून येणं जाणं असलं तरी आळंदीतच रमणारा हा कार्तिक गेली सात आठ वर्ष वारी करतोय. केवळ ज्ञानोबारायांच्या कृपेने वारी करतोय, अशी भावना तो व्यक्त करतोय. माऊलींच्या कृपेनेच वारी घडते अशी कृतार्थ भावना बीएससी ऍग्री केलेला बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचा सोपान माटे व्यक्त करतो. व्यावसायिक शिक्षण घेऊनही सोपान सारखे अनेक तरुण माऊलींच्या रथापुढे व रथामागे असणाऱ्या शेकडो दिंड्यांमध्ये आढळतात. उद्देश एकच ताण तणाव दूर करणे त्यातून परमार्थ साध्य करणे, संसाराचा गाडा ओढत असतानाच परमार्थाची गोडी लागणे, हे महत्त्वाचं असल्याचं मत माऊलींच्या रथापुढील सतराव्या दिंडीचे ज्ञानेश्वर महाराज सावर्डेकर व्यक्त करतात.

तरुण आणि ज्येष्ठांचा सहभाग असलेल्या या दिंडीत हे तरुण ज्येष्ठांशी कशा पद्धतीने जुळून घेतात याविषयी सावर्डेकर म्हणतात, "ही संकल्पनाच मुळात पाळली जात नाही. लहान थोर सारेच एक असे माऊलींनी  सांगितलेले आहे. त्याचीच रुजवात दिंड्यांमधूनही दिसून येते." तरुणांच्या वाढत्या प्रमाणाबद्दल सावर्डेकर अभिमानाने आणि खात्रीनं असं सांगतात. तरुणांच्या हाती असलेली ही वैष्णवांची पताका यापुढे अभिमानाने कायम उंचावत राहील. येत्या काही काळात वारीचे स्वरूप या तरुणाईच्या सहभागाने वेगळे झालेले आपल्याला दिसून येईल अशी खात्री त्यांना आहे.

सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात क्षणिक सुखाऐवजी कायमस्वरूपी तणावमुक्त जीवनाचा ध्यास घेऊनच ही तरुण मंडळी वारीत सहभागी होत आहेत. आपण हॉटेलमधूनही आता चुलीवरच्या जेवणाला प्राधान्य देत आहोत, जून्याकडे अनेकांचा कल आहे. अनेक टीव्ही चॅनेल्सवर सकाळचा वेळ हा कीर्तन प्रवचनासाठी दिल्याचा आपण बघतोय हा एक सकारात्मक बदल आहे अशी भावना विणेकरी तुकाराम धाडगे व्यक्त करतात.  पूर्वी दिंड्यांमधून ज्येष्ठांची संख्या जास्त होती. त्यात महिला व पुरुषही असायचे आणि मात्र महिलांचे प्रमाण कमी होत असले तरी पुरुषांमध्ये तरुण व मध्यमवर्गीय पुरुषांचे प्रमाण जास्त आहे हा बदल सकारात्मक आहे असे मत गेली तीस वर्षे वारी करणाऱ्या हडपसरमधील अशोक जगताप यांचे आहे.

Web Title: Aashadhi Wari 2023 is getting young number of youth in Dindis increased; Spiritual satisfaction attraction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.