Aashadi Vaari | पालखी मार्गावर हाेणार काेराेना चाचणी अन् लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 01:59 PM2022-06-07T13:59:23+5:302022-06-07T14:00:36+5:30
महापालिका आयुक्तांची माहिती, प्रशासनाकडून जय्यत तयारी...
पुणे : तब्बल दाेन वर्षानंतर हाेत असलेल्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांबराेबरच प्रशासन जय्यत तयारी करत आहे. काेराेनाचा संभाव्य धाेका विचारात घेऊन पालखी मार्गावर कोरोना चाचणीसह प्रतिबंधक लसीकरणाची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली.
पालखी साेहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी मंगळवारी (७ जून) सर्व खातेप्रमुखांची बेठक घेण्यात आली. यात रस्ते, पाणी, निवास या सुविधांसह कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन नियोजन केले जात आहे. त्यासाठी मंगळवारी (७ जून) सर्व खातेप्रमुखांची बैठक घेत आयुक्तांनी वरील माहिती दिली.
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. सोमवारी शहरात १,२०० चाचण्या झाल्या. त्यापैकी ६० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. शहरात बाधितांची संख्या वाढली असली, तरी सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे पाहायला मिळत आहेत. हे सर्व रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. सध्या सर्व प्रभागांमध्ये चाचणीसाठी प्रत्येकी एक केंद्र आहे. गरज भासल्यास चाचण्यांची संख्या वाढविली जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याचे नियोजन करताना विशेष काळजी घेतली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी विधान भवन येथे श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा - २०२२ पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली हाेती. त्यात आरोग्य सुविधांवर विशेष लक्ष देण्याचा निर्णय झाला. त्यापाठोपाठ महापालिकेनेही पालखी सोहळा कालावधीत आरोग्य सुविधा पुरविण्याची विशेष तयारी केली आहे.
आयुक्त म्हणाले...
- वारकऱ्यांना बूस्टर डोस माेफत देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
- पालखी सोहळा काळात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविण्यासाठी तपासणी केंद्र वाढविण्यात येणार आहेत.
- सध्या शहरात २५ तपासणी केंद्र कार्यान्वित असून, पालखी मार्ग आणि मुक्कामाच्या ठिकाणी केंद्रांची संख्या वाढविणार आहे.