’आया फिर सुखमय बसंत’....मधुर रचनांची सजली मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:11 AM2021-03-14T04:11:44+5:302021-03-14T04:11:44+5:30
पुणे : वसंत ॠतुच्या विविध बहारदार आणि मधुर हिंदी रचनांची मैफल नुकतीच सजली. निमित्त होते आकाशवाणी पुणे केंद्राचे माजी ...
पुणे : वसंत ॠतुच्या विविध बहारदार आणि मधुर हिंदी रचनांची मैफल नुकतीच सजली. निमित्त होते आकाशवाणी पुणे केंद्राचे माजी उपसंचालक डॉ. सुनील केशव देवधर संचालित मेधा फाउंडेशनद्वारा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित ‘आया सुखमय बसंत’ या कार्यक्रमाचे. राजेश दातार, गायत्री सप्रे-ढवळे, दीपशिखा विकास भावे या गायकांच्या माधुर्यपूर्ण गायकीने कार्यक्रमात रंगत आणली.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष, साहित्यिक डॉ. दामोदर खडसे, माजी आमदार उल्हास पवार उपस्थित होते. नृत्यगुरू मनिषा साठे, प्रसिद्ध तबलावादक अरविंदकुमार आझाद यांचा सत्कार माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
वसंत गीतांच्या रचना यावेळी सादर झाल्या. या सर्व रचनांना राहुल श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केले. महादेवी वर्मा यांच्या ‘धीरे धीरे उतर क्षितिज से आ वसंत रजनी’ या गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमात एकूण दहा गाणी सादर झाली. निर्मल चंद निर्मल, महाप्राण निराला आणि डॉ. देवधर आदींच्या वसंत गीतांनी या कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाची स्वरूप संकल्पना लेखन आणि निवेदन डॉ. सुनील केशव देवधर यांचे होते. अमित जोशी यांनी तबल्यावर तर रोहित कुलकर्णी यांनी हार्मोनियमवर साथ दिली. दीप्ती पेठे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.