दुर्बलांसाठी ‘आयुष्यमान ’ ठरतेय नवसंजीवनी : एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 03:14 PM2019-03-09T15:14:03+5:302019-03-09T15:16:22+5:30
आयुष्यमान भारत ही जगातील सर्वांत मोठी आरोग्य सेवा योजना असून याचा लाभ १० कोटी ७४ लाख कुटुंबातील ५५ कोटी लोकांना होणार आहे.
पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना विविध आजारांवर उपचार घेणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी आयुष्यमान भारत योजना व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना नवसंजीवनी ठरत आहे, असे मत राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
सुर्या सह्याद्री रुग्णालय दोन्ही योजनांसाठी समर्पित करण्यात आले आहे. अशी सुविधा देणारे हे भारतातील पहिले रुग्णालय ठरले आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री जे.पी.ड्डा यांनी या उपक्रमाचे शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरिन्सिंगद्वारे लोकार्पण केले. पुण्यात झालेल्या कार्यक्रमावेळी शिंदे यांच्यासह सह्याद्री हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ.चारूदत्त आपटे,कार्यकारी संचालिका डॉ.जयश्री आपटे, एमपीजेएवाय चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे, नॅशनल इन्श्युरन्स कंपनीचे सीआरएम रवी अय्यर आदी उपस्थित होते. यावेळी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
नड्डा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. आयुष्यमान भारत ही जगातील सर्वांत मोठी आरोग्य सेवा योजना असून याचा लाभ १० कोटी ७४ लाख कुटुंबातील ५५ कोटी लोकांना होणार आहे. देशात आतापर्यंत साडे चौदा लाख लोकांना लाभ मिळाला आहे. सुर्या सह्याद्री रुग्णालयाचे हे पाऊल कौतुकास्पद आहे, असे नड्डा म्हणाले.
रुग्णालयामध्ये कार्डिओलॉजी, कार्डियाक सर्जरी, न्युरो सर्जरी, कॅन्सर केअर यांसारख्या सुपर स्पेशालिटीज गरजू रूग्णांना उपलब्ध आहेत. ७१ खाटांच्या या रुग्णालयामध्ये सर्व अद्यायावत व अत्याधुनिक सुविधा आहेत. हॉस्पिटलला एनएबीएच प्रमाणपत्र मिळाले असून एमपीजेएवाय क्वालिटी सेल चे गुणवत्तेसाठी उच्च दर्जाचे मानांकन मिळाले आहे, अशी माहिती डॉ. आपटे यांनी दिली.
----------