भोर संस्थानचे आबाराजे पंतसचिव यांचे वृद्धापकाळाने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 10:11 PM2021-02-22T22:11:40+5:302021-02-22T22:12:27+5:30
भोर संस्थानचे राजे आबाराजे (चितामणराव) सदाशिवराव पंतसचिव (वय ८६) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.
भोर संस्थानचे राजे आबाराजे (चितामणराव) सदाशिवराव पंतसचिव (वय ८६) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. भोर संस्थानचे ते १३ वे वंशज होते.त्यांच्यामागे पत्नी उर्मिलादेवी, मुलगे राजेशराजे,दीपकराजे व योगेशराजे हे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
आबाराजे यांना क्रिकेट आणि टेनिस खेळाची विशेष आवड होती. १९५६ साली ते पुणे विद्यापीठाच्या क्रिकेट टीमचे कर्णधार होते.वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत ते टेनिसच्या स्पर्धांमध्ये भाग घेत होते.त्यांना फिरण्याचीही विशेष आवड असल्याने त्यांनी जगभरातील अनेक देशांना भेटी दिल्या होत्या.
भोरमधील सर्वात जुन्या समजल्या जाणाऱ्या संस्थानकालीन भोर एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष होते. आबाराजेंचे आजोबा राजा रघुनाथराव यांनी भोरमध्ये सुरु केलेल्या रामनवमी महोत्सवाचा वडिलांच्या काळात काही वर्षे पडलेला खंड १९७८ साली त्यांनी पुन्हा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी सर्व भोरवासीयांना राजवाड्यात महाप्रसाद दिला जायचा.मनमिळाऊ स्वभावाचे असलेले आबाराजे पंतसचिव यांना भोरवासियांविषयी मोठा आदर होता.