अबब.... पदवीधरसाठी जम्बो मतपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:11 AM2020-11-28T04:11:28+5:302020-11-28T04:11:28+5:30
पुणे : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर निवडणुकीसाठी ६२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, या उमेदवारांची मतपत्रिका जम्बो झाली आहे. ...
पुणे : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर निवडणुकीसाठी ६२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, या उमेदवारांची मतपत्रिका जम्बो झाली आहे. मतपत्रिका घडी केल्यावर बारीक चित्र असल्याने मतपेटीत घुसवण्यापासून ते आठशे ते हजार मतपत्रिकांचा गठ्ठा ३२ ते ३५ किलो वजनाचा होत आहे. या जम्बो मतपत्रिकेमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मतपत्रिकाद्वारे पसंती क्रमांकानुसार मतदान करून होणार आहे. या निवडणुकीत ६२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांची नावे आणि चिन्हे तसेच निवडणुकीचा तपशील याप्रमाणे मतपत्रिका तयार केली असून ती जम्बो आकाराची झाली आहे. यामध्ये पत्रिकेचा आकार मोठा असल्याने घडी केल्यानंतर ही मतपत्रिका मतपेटीमध्ये टाकता येईल किंवा कसे मतपेटीचा आकार लक्षात घेता त्यामध्ये किती मतपत्रिका बसू शकतील याचा अंदाज निवडणूक प्रशासनाने घेतला. मतपेटीचे छिद्र छोटे असल्याने त्यामधून मतपत्रिकाची केलेली घडी आतमध्ये जात नव्हती. त्यामुळे मतपत्रिकेच्या आकारात काही बदल केला आहे.