अबब..! लष्कराच्या १२ जागांच्या भरतीसाठी तब्बल १० हजाराहून अधिक मुली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 06:00 PM2021-01-12T18:00:49+5:302021-01-12T19:33:29+5:30

केवळ १२ जागांसाठी प्रवेश पत्र मिळाले नसतानाही १० हजाराहून अधिक मुली आल्याने गोंधळ झाला.

Abb ..! More than 10,000 girls recruited for 12 Army posts | अबब..! लष्कराच्या १२ जागांच्या भरतीसाठी तब्बल १० हजाराहून अधिक मुली

अबब..! लष्कराच्या १२ जागांच्या भरतीसाठी तब्बल १० हजाराहून अधिक मुली

Next
ठळक मुद्देमहिला लष्कर भरतीत गोंधळ : प्रवेश पत्र मिळाले नसतानाही आल्या अनेक मुलीप्रवेश पत्र मिळालेल्याच उमेदवारांनी भरतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

पुणे/वानवडी : महाराष्ट्र, गुजरात तसेच गोवा विभागासाठी महिलांसाठी मंगळवारी पुण्यात झालेल्या लष्कर भरती दरम्यान केवळ १२ जागांसाठी प्रवेश पत्र मिळाले नसतानाही १० हजाराहून अधिक मुली आल्याने गोंधळ झाला. हडपसर येथील एआयपीटी समोर मोठ्या संख्येने जमत मुलींनी घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, लष्कराच्या वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांनी हस्तक्षेप करत मुलींच्या जमावाला माघारी पाठवले.

लष्कराने महिलांसाठी विशेष भरतीचे आयोजन केले होते. ही भरती गेल्या वर्षी होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे ही भरती स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, मुलींकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. तिन राज्यांसाठी १०० पेक्षा अधिक जागा रिक्त होत्या. त्यासाठी ही भरती घेतली जाणार होती. या जागांसाठी तब्बल २२ हजाराहून अधिक अर्ज आल्याची माहिती लष्कराच्या भरती विभागाच्या सुत्रांनी ‘लोकमत’ला दिली. कोरोनामुळे स्थगित झालेली ही भरती प्रक्रिया मंगळवार ते गुरूवार या काळात राबविली जाणार होती. केवळ प्रवेश पत्र मिळालेल्याच उमेदवारांनी भरतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.

भरतीसाठी सोमवारीच रात्री अनेक मुली रेस कोर्स समोरील एआयपीटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जमल्या होत्या. अनेकांनी प्रवेश द्वारासमोरील मुख्य रस्त्याच्या पदपथावरच रात्र काढली. पुणे विभागासाठी केवळ १२ जागारिक्त होत्या. यासाठी लष्कराने ‘कट ऑफ’ लावत ४५० मुलींनाच भरतीसाठी बोलावले होते. मात्र, प्रवेश पत्र मिळाले नसतानाही भरतीची संधी मिळेल या आशेने तसेच ही भरती प्रक्रिया खुली असल्याचा समज झाल्याने अनेक मुली भरतीसाठी आल्या.

राज्यासह गोवा आणि गुजरात येथून मोठ्या प्रमाणात मुली आल्या. मात्र, लष्करातर्फे केवळ ओळखपत्र देण्यात आलेल्या ४५० मुलींनाच प्रवेश देण्यात आला. यामुळे मोठ्या प्रमाणात जमलेल्या मुलींनी एआयपीटीच्या प्रवेशद्वारासमोर जमत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. प्रवेश न मिळाल्याने अनेक मुलींनी घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. मुली मोठ्या प्रमाणात असल्याने पोलिसांचा बंदोबस्त ही काही करू शकला नाही. वाढता गोंधळ लक्षात घेता लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत ध्वनिक्षेपकावरून मुलींना सुचना केल्या. ओळख पत्र असणाऱ्यांनाच प्रवेश मिळणार असे सांगितल्यावर नाईलाजाने भरतीसाठी आलेल्या अनेक मुलींना हताशपणे पुन्हा माघारी परत जावे लागले.
-------
भरती प्रक्रियेविषयी अनेक मुली अनिभज्ञ
लष्कराच्या या भरती प्रक्रियेबद्दल अनेक मुली अनभिज्ञ होत्या. ही सैन्य भरती खुली असल्याचा गैरसमज झाल्याने भरपूर मुली अर्ज न भरता याठिकाणी आल्या. यातील काहींनी अर्ज भरले होते. परंतु त्यांना प्रवेश पत्र मिळाले नाही. तरीसुद्धा भरती होण्याची महत्वाकांक्षा बाळगत याठिकाणी आल्या होत्या. सोबत आलेल्या पालकांना सुद्धा याबाबत काही समजेनासे झाले होते.  

१७ ते २१ वयोगटातील मुलींसाठी असणाऱ्या सैन्य भरतीसाठी २७ जुलै ते ३१ आँगस्ट २०२० च्या दरम्यान अर्ज मागवण्यात आले होते. हे अर्ज केल्यानंतर पात्र उमेदवाराला नोंदणी केलेल्या ई-मेल वर प्रवेशपत्र पाठविण्यात येणार असल्याचे जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले होते. तरीसुद्धा ही खुली भरती असल्याचा समज करुन अमरावती, कुर्रा, उस्मानाबाद, वाशीम, हिंगोली, तुळजापूर अशा विविध भागातून मुली याठिकाणी आल्या होत्या. ही भरती अंबाला, लखनौ, जबलपूर, बेंगलोर, शिलँाग व पुणे या ठिकाणी होत आहे.
पुढील दोन दिवस भरती प्रक्रिया सुरु असून अर्ज केल्यानंतर ज्या मुलींना त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेल वर प्रवेशपत्र मिळाले आहे, त्यांनीच सैन्य भरती साठी यावे असे आवाहन वानवडी गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी यावेळी केले आहे.
-----------
लष्करातर्फे महिलांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली होती. यासाठी जवळपास २२ हजार अर्ज आले होते. जागा कमी असल्याने आम्हाला एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारांना बोलावने शक्य नव्हते. यासाठी ८५ टक्कांचा कट ऑफ लावण्यात आला. त्या नुसार मोजक्याक ४५० महिला उमेदवारांना बोलवण्यात आले होते. मात्र, अनेकांचा गैरसम झाल्याने मोठ्या प्रमाणात उमेदवार आले होते. त्यांची समजुत काढून माघारी पाठवण्यात आले.
- कर्नल मनिष करकी (रिक्रुटमेन्ट ऑफीसर)
......................

मुलींची सैन्य भरती असल्याची जाहीरात पाहून मी व माझ्या तीन मैत्रिणी पल्लवी मेश्राम, इशा नागपुरे, अश्विनी कुरेकर अमरावती व कुर्रा या भागातून येथे आलो. खुली भरती प्रक्रिया असल्याचे आम्हाला कळाले असल्याने कोणताही अर्ज न भरता पुण्यात आलो. परंतु येथे प्रवेश पत्राशिवाय प्रवेश देण्यास नकार दिला.
- मनिषा पवार, अमरावती
---
आम्ही भरतीविषयक जाहिरात पाहून अर्ज भरला होता. परंतू कोणतेही प्रवेशपत्र आम्हाला लष्कराकडून आले नाही. अर्ज भरल्यामुळे आम्हाला प्रवेश मिळेल, या आशेवर येथे भरतीसाठी आलो. परंतु येथे प्रवेशपत्र मागत असल्याने आमची निराशा झाली आहे.
- अंबिका बाळु शिंगे व रेणुका बाळू शिंगे, तुळजापूर
.

Web Title: Abb ..! More than 10,000 girls recruited for 12 Army posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.