एबीसीच्या नावे फसवणारा अटकेत, अनेकांना गंडवले : सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 04:07 AM2017-08-21T04:07:21+5:302017-08-21T04:07:21+5:30
सिंहगड रस्त्यावरील वडगाव येथे अॅन्टी करप्शन इन्व्हीस्टिगेशन ब्युरो अशा भपकेबाज नावाने कार्यालय उघडून लोकांकडून सभासद फी घेत कारवाईचे अधिकार बहाल करणाºयास फसवणुकीच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडून अटक केली.
पुणे : सिंहगड रस्त्यावरील वडगाव येथे अॅन्टी करप्शन इन्व्हीस्टिगेशन ब्युरो अशा भपकेबाज नावाने कार्यालय उघडून लोकांकडून सभासद फी घेत कारवाईचे अधिकार बहाल करणाºयास फसवणुकीच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडून अटक केली.
दिलीप लक्ष्मण चौगुले (फ्लॅट ११८, रिलायबल पार्क, गोडोली, सातारा) असे आरोपीचे नाव आहे. स्वप्निल सकट यांनी याबाबत फिर्याद केली आहे. वडगाव येथे सुजय कॉम्प्लेक्स येथे अॅन्टी करप्शन इन्व्हीस्टिगेशन ब्युरो नावाने कार्यालय उघडून काही जणांकडून १००० रुपये घेत कारवाई करण्याचे अधिकार देण्याचे आमिष चौगुले दाखवत होता.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे त्याबाबत फसवणूक होत असल्याचा तक्रार अर्ज करण्यात आला होता. त्याबाबत पडताळणी करून कारवाईचे आदेश त्यांनी दिल्याने पुणे विभागाचे अधीक्षक संदीप दिवाण यांनी सहायक आयुक्त अशोक शिर्के व पथकाला कारवाईचे आदेश दिले होते.
या पथकाने चौगुले याच्या कार्यालयाची झडती घेऊन काही कागदपत्रे जप्त केली. त्या वेळी काहीजणांनी येऊन चौगुले याने फसवणूक केल्याचे सांगितल्याने त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. सिंहगड पोलीस ठाण्यात त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.