जेजुरीत तीन कोटींच्या खंडणीसाठी अपहरणाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 05:56 PM2017-10-01T17:56:52+5:302017-10-01T18:10:47+5:30
बारामती तालुक्यातील जोगवडी येथील एका जमीन खरेदीविक्री करणाºया व्यावसायिकास तीन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्याचा प्रयत्न त्या व्यावसायिकाच्या प्रसंगावधानतेमुळे फसला.
जेजुरी : बारामती तालुक्यातील जोगवडी येथील एका जमीन खरेदीविक्री करणाºया व्यावसायिकास तीन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्याचा प्रयत्न त्या व्यावसायिकाच्या प्रसंगावधानतेमुळे फसला. आरोपींना पकडून पोलीस कोठडीत टाकण्यात जेजुरी पोलिसांना यश आले आहे. आरोपींना सासवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की येथील व्यावसायिक किरण शांताराम भोसले हे ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११.२५ वाजण्याच्या सुमारास जेजुरी येथे कामानिमित्त आले होते. यावेळी जुनी जेजुरी येथील कोळविहिरे चौकात आरोपी उदयसिंह महाराज प्रताप चव्हाण (रा. कामोठे, ता. पनवेल, नवी मुंबई), प्रवीण लालासाहेब पवार (रा. जेजुरी ता. पुरंदर) आणि शिरीष चंद्रकांत खोत (रा. मुलुंड पूर्व, मुंबई) यांनी भोसले याचे अपहरण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने ओढत नेले . माटार(एसयूव्ही ५००, एम एच ४६ पी १००८) मध्ये टाकण्याचा प्रयत्न करीत होते. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून फिर्यादी भोसले यांनी आरोपींच्या हातून स्वत:ची सुटका करून जेजुरी पोलिसांना भ्रमणध्वणीवरून संपर्क साधला. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेवून आरोपींना ताब्यात घेतले.
पोलिसांनी भा.द.वी. कलम ३८५, ३६४ अ ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना सासवड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे स. पो. नि. रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश मालेगावे-पाटील हे करीत आहेत.
आरोपी हे ही जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असून त्यांच्यावर अनेकांना फसवल्याचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आरोपींकडून ज्यांची कोणाची फसवणूक झाली असेल अथवा कोणाची तक्रार असेल त्यांनी जेजुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन स. पो. नि. रामदास वाकोडे यांनी केले आहे.