पुण्यातून खंडणीसाठी महिलांचे अपहरण; गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 'अशी' केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 10:49 AM2023-09-15T10:49:36+5:302023-09-15T10:50:39+5:30

प्रकरण पोलिसात जाताच अवघ्या काही तासात पोलिसांनी दोन्ही महिलांची सुटका करत सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या

Abduction of women for ransom from Pune The crime branch police made such an escape | पुण्यातून खंडणीसाठी महिलांचे अपहरण; गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 'अशी' केली सुटका

पुण्यातून खंडणीसाठी महिलांचे अपहरण; गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 'अशी' केली सुटका

googlenewsNext

किरण शिंदे

पुणे : सतरा लाख रुपयांच्या खंडणीसाठी पुण्यातील दोन महिलांचे अपहरण करण्यात आले होते. या महिलांना डांबून ठेवत जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत या महिलांची सुटका होणार नाही असे फर्मानच आरोपींनी जारी केले होते. मात्र प्रकरण पोलिसात जाताच अवघ्या काही तासात पोलिसांनी दोन्ही महिलांची सुटका करत सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली. 

बाबुलाल लक्ष्मण मोहोळ (वय 45, वर्षे सरडे बाग उत्तमनगर पुणे),  अमर नंदकुमार मोहिते (वय 39 वर्षे गणेश नगर पुणे) आणि  प्रदीप प्रभाकर नलवडे (वय 38, भूगाव ,पुणे), अक्षय मारूती फड (वय 24 रा. वारजे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. उत्तम नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी बाबूलाल मोहोळ हा शरद मोहोळ टोळीचा गुंड आहे. तर पीडित महिला सामाजिक कार्यकर्त्या आहेत. या महिलांनी पुणे स्टेशन परिसरात स्टॉल मिळून देतो असे सांगून आरोपी बाबुलाल मोहोळ याच्याकडून काही रोख रक्कम घेतली होती. मात्र स्टॉल न मिळाल्याने आरोपी बाबुलाल आणि त्याच्या साथीदारांनी कात्रज आणि वारजे परिसरातून दोन महिलांचे अपहरण केले आणि त्यांना डांबून ठेवले होते. त्यानंतर आरोपींनी या महिलांच्या घरी फोन करून 17 लाख रुपये खंडणी देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास त्यांना ठार मारण्याची धमकीही देण्यात आली.

या घटनेनंतर घाबरलेल्या ज्येष्ठ महिलेच्या मुलाने पुणे पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान या महिलांना उत्तम नगर परिसरातील आरोपींच्या घरात डांबून ठेवल्याची माहिती पोलीस नाईक शंकर संपते यांना मिळाली होती. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने आरोपीच्या घरातून या दोन्ही महिलांची सुखरूप सुटका केली आणि चार आरोपींना अटक केली. 

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सतीश गोवेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोउपनि श्रीकांत चव्हाण, त्यांच्यासह पोलीस कर्मचारी विजय गुरव, प्रदिप शितोळ, विनोद साळुंखे, सुरेंद्र जगदाळे, राहुल उत्तरकर, शंकर संपते, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

Web Title: Abduction of women for ransom from Pune The crime branch police made such an escape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.