परप्रांतीयांना मारहाण करणारे अद्याप फरार, अटक न केल्यास रिपाइंचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:16 AM2017-10-25T01:16:43+5:302017-10-25T01:16:45+5:30
बारामती : बारामती एमआयडीसीतील बाळकृष्ण पेपर मिलमधील परप्रांतीय कामगारांना अमानुष मारहाण करणारे आरोपी अद्यापही फरारी आहेत.
बारामती : बारामती एमआयडीसीतील बाळकृष्ण पेपर मिलमधील परप्रांतीय कामगारांना अमानुष मारहाण करणारे आरोपी अद्यापही फरारी आहेत. या प्रकरणी कंपनीच्या मालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार (दि. २२) या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी; अन्यथा धरणे अांदोलनासह बारामती बंदचा इशारा निवेदनाद्वारे रिपाइं कार्यकर्त्यांनी केली आहे.
औद्योगिक वसाहतीत या कंपनीत परप्रांतीय आठ कामगारांना डांबून ठेवून कंपनीचे मालक संतोष सिंग, मॅनेजर संजय सिंग, सुपरवायझर महावीर सिंग यांनी मारहाण केल्याची तक्रार आहे. तिघांविरुद्ध तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी फरारी आहेत. त्यामुळे या आरोपींना अटक करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ राऊत, रिपाइंचे तालुका अध्यक्ष मधुकर मोरे, युवकाध्यक्ष विश्वास भोसले, शहराध्यक्ष संजय वाघमारे, जिल्हा सरचिटणीस विजय सोनवणे, माऊली कांबळे, बाळासाहेब सरतापे, मयूर आढाव, सुरेश सोनवणे, अमोल जगताप, अजिंक्य भोसले, मंगलदास निकाळजे आदिंनी केली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक (बारामती ग्रामीण) डॉ. संदीप पखाले यांना निवेदन दिले आहे. आरोपींना अटक न केल्यास शुक्रवारी (दि. २७) पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करून शनिवारी बारामती बंदचा इशारा देण्यात आला आहे.