Abdul Sattar: अब्दुल सत्तारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, रुपाली ठोंबरे संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 04:20 PM2022-11-07T16:20:21+5:302022-11-07T16:21:37+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे

Abdul Sattar will not be allowed to roam in Maharashtra, Rupali Thombre is angry after stated on supriya sule by abdul sattar | Abdul Sattar: अब्दुल सत्तारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, रुपाली ठोंबरे संतापल्या

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, रुपाली ठोंबरे संतापल्या

Next

पुणे - शिंदे गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. एकीकडे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाबरावांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलं, तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्याही मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावरुन संतापल्या आहेत. अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंबद्दल वादग्रस्त विधान केलं होत. त्यानंतर, राष्ट्रवादीचे नेते चांगलेच संतापले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात अब्दुल सत्तार यांच्यासारखे नेते महिलांविषयी काहीही बोलतात. तरीही ते मंत्रिपदावर राहतातच कसे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात बसू देणार नाही, असा इशाराच विद्या चव्हाण यांनी दिला आहे. तसेच, शिंदे गटाचे तीन मंत्री सध्या आमच्या रडारवर आहेत. रवींद्र चव्हाण हे भायखळ्यातील एका बलात्काराचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. तर गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार यांनी महिलांचा अवमान करणारी वक्तव्य केली आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने या तिघांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणीही विद्या चव्हाण यांनी केली. तर, राष्ट्रवादीच्या पुण्यातील नेत्या रुपाली ठोंबरे यांनीही अब्दुल सत्तारांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. 

“शिंदे सरकारमधील मंत्री सातत्याने राजकारणातील महिलांविषयी अपशब्द वापरत आहेत. आज अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरले आहेत. अब्दुल सत्तार आपण किती दलिंदर विचारांचे आहात. आपण मंत्री होण्याच्या पात्रतेचे आहात का? आपण जाणूनबुजून महिलांबाबत जे बोलता हे महाराष्ट्रासाठी घातक आहेत. तुम्ही माफी जरी मागितली, तरी यापुढे तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. तुमची मंत्री होण्याची लायकी नाही. तुम्ही राजीनामा दिला पाहिजे”, अशी संतप्त प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिली आहे.

काय आहे प्रकार

औरंगाबादेत मंत्री अब्दुल सत्तार हे एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांना सुप्रिया सुळेंनी ५० खोकेवरुन केलेल्या टिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी, सत्तार यांनी कॅमेरासमोरच सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द वापरले. या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले असून अब्दुल सत्तारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. तसेच, अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली आहे. 

Web Title: Abdul Sattar will not be allowed to roam in Maharashtra, Rupali Thombre is angry after stated on supriya sule by abdul sattar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.