अबब!!! प्रतिकिलोमीटर १८ कोटींचा खर्च, तरीही समस्या ‘जैसे थे’च

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 03:43 AM2019-01-31T03:43:07+5:302019-01-31T03:43:27+5:30

आणखी २८ कोटी रुपयांची काढली प्रशासनाने निविदा

Abe !!! The expenditure on the expenditure of 18 crores, still the problems were 'like' | अबब!!! प्रतिकिलोमीटर १८ कोटींचा खर्च, तरीही समस्या ‘जैसे थे’च

अबब!!! प्रतिकिलोमीटर १८ कोटींचा खर्च, तरीही समस्या ‘जैसे थे’च

Next

पुणे : स्वारगेट ते कात्रजदरम्यानच्या सातारा रस्ता शहरातील बहुधा सर्वात खर्चिक आणि महागडा रस्ता ठरण्याची चिन्हे दिसत असून या रस्त्यावर बीआरटी पुनर्विकास आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली आतापर्यंत १०३ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या रस्त्यावर प्रतिकिलोमीटर तब्बल १८ कोटी रुपयांचा खर्च झाला असून समस्या मात्र जशाच तशाच आहेत. त्यामुळे हा करदात्या पुणेकरांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याची टीका प्रशासनावर होऊ लागली आहे.

पुण्यामधील पहिला बीआरटी मार्ग याच रस्त्यावर तयार केला होता. त्यानंतर प्रशासनाने या रस्त्यावरील बीआरटीच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतले. यासोबतच संपूर्ण सहा किलोमीटरचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात आला. अद्ययावत सायकल ट्रॅकसोबतच सुशोभीकरणाचा दावा प्रशासनाने केला होता. यासोबतच पदपथांचे रुंदीकरणही करण्यात आले. त्याच्यावरही भरमसाठ खर्च करण्यात आला.

या रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी होईल, अशी आशा सर्वसामान्यांना दाखविण्यात आली होती. मात्र, वाहतूककोंडी अद्यापही सुटलेली नाही. तसेच वेळोवेळी वेगवेगळे प्रयोग राबवूनही बीआरटी मार्ग सुरू झालेला नाही. त्यामुळे या रस्त्यावर खर्च केलेला पैसा कुठे जिरला, अशी विचारणा होऊ लागली आहे.

महापालिका प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी साईबाबा मंदिर ते कात्रज या ५.६ किलोमीटरच्या रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी ७५ कोटी रुपयांची निविदा काढली होती. बीआरटी पुनर्रचनेसोबतच अर्बन स्ट्रीट गाईडलाईन्सप्रमाणे रस्त्याचा पुनर्विकास हाती घेण्यात आला होता. दोन वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही रस्त्याची कामे शिल्लक आहेत. ज्यासाठी सर्व अट्टहास केला गेला ती बीआरटीच अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. आवश्यकता नसतानाही उत्तम स्थितीतील रस्त्यावर विविध प्रयोग राबवत प्रशासन नागरिकांच्या डोक्याचा ताप वाढवत असल्याचे चित्र आहे.

अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाले असून बऱ्याच ठिकाणांवरील सिमेंटचे पोलार्ड तुटलेले आहेत. सुशोभीकरणासाठी लावलेली फुलझाडे कोमेजलेली आहेत. कात्रज डेअरी परिसरातील एका खासगी जागेचे भूसंपादन शिल्लक असल्याने तेथील रुंदीकरण रखडलेले आहे, तर जागोजाग सायकल ट्रॅकचा वापर वाहनांच्या पार्किंगसाठी होताना दिसत आहे.

सातारा रस्त्याच्या सुशोभीकरणाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, कामाचा दर्जा चांगला नाही. अनेक ठिकाणी कामे शिल्लक आहेत. पावसाळी पाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नाही. सिमेंटचे पोलार्ड जागोजाग तुटले आहेत. वारेमाप खर्च करून प्रशासनाने नेमके काय साधले, हा संशोधनाचा विषय आहे. यापूर्वी ७५ कोटींची निविदा काढण्यात आली होती. नुकतीच या कामासाठी २८ कोटींची निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन कारण नसताना पाण्यासारखा पैसा या रस्त्यावर खर्च करीत सुटले आहे.
- नितीन कदम, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
पर्वती विधानसभा

सिमेंट रस्त्यांची कामे सुरूच राहणार; सदस्यांच्या दबावामुळे प्रशासनाची माघार
पुणे : शहरातील गंभीर पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने सिमेंट रस्त्यांची कामे थांबविण्याचे आदेश दिले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या या आदेशामुळे सदस्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. यामुळे २४ तासांच्या आत प्रशासनाने माघार घेतली असून, सिमेंट रस्त्यांची कामे सुरूच राहातील, केवळ यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर न करता प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्यात येईल, असे नवीन आदेश आयुक्तांनी काढले. पाण्याचा गैरवापर होऊ नये, यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा लावण्यात येणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले.

आगामी निवडणुकांच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत. प्रामुख्याने सिमेंट रस्त्यांची तर तब्बल शंभर ते दीडशे कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. सिमेंट रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. शहरामध्ये सध्या गंभीर पाणीटंचाई असताना सिमेंट रस्त्यांना बंदी घालण्याची मागणी करण्यात येत होती. सिमेंट रस्त्यांसाठी पिण्याचे पाणी वापरले जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता लक्षात घेऊन, चालू कांमांसाठी (वर्क आॅर्डर दिलेली) सांडपाणी वापरावे आणि नवी कामे करू नयेत, असा आदेश महापालिका प्रशासनाने मंगळवारी (दि. २९) काढला होता. त्यावर आक्षेप घेऊन नगरसेवकांनी प्रशासनाच्या आदेशाला विरोध केला. या आदेशामुळे निधी वाया जाणार असल्याचे सांगत, रस्त्यांची कामे थांबवू नयेत, अशी मागणी लावून धरली. स्थायी समितीच्या बुधवारी (दि. ३०) झालेल्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. कामे थांबविण्याच्या आदेशाबाबत चर्चा झाली, तेव्हा सांडपाणी वापरण्याचा तोडगा काढण्यात आला. रस्ते आणि अन्य प्रकारची कामे सुरू आहेत. ती थांबविली जाणार नाहीत. त्यासाठी सांडपाण्याचा वापर करावा, असे राव यांनी बैठकीत सांगितले. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले, की सध्या रोज पाचशे ते सहाशे एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होते. त्याचा वापर रस्त्यांच्या कामांसाठी करता येईल.

पाण्याचा गैरवापर होऊ देणार नाही
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंदाजपत्रकातील निधी वेळेत खर्च होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सिमेंट रस्त्यांची कामे थांबविणे शक्य नाही. परंतु यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होणार नाही, यावर कडक निर्बंध घालण्यात येणार आहेत. सिमेंट रस्त्यांसाठी केवळ प्रक्रिया केलेले सांडपाणीच वापरण्यात येईल, सांडपाणी उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा लावण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा गैरवापर होऊ न देता विकासकामे सुरू राहतील.
- योगेश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष

Web Title: Abe !!! The expenditure on the expenditure of 18 crores, still the problems were 'like'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.