अबब..! २५ टन प्लॅस्टिक जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:59 AM2018-04-11T01:59:09+5:302018-04-11T01:59:09+5:30
आइस्क्रीमच्या दुकानांतील प्लॅस्टिकचे चमचे... चहाची दुकाने, हॉटेलमधील प्लॅस्टिकचे ग्लास... फूड पॅकेट, भाजीविक्रेते, दुकानदार, मॉल... कपड्याची दुकाने पिशव्या... थर्मोकॉल डिश.. आदी विविध प्रकारचे तब्बल २५ टन प्लॅस्टिक महापालिकेने आतापर्यंत जप्त केले.
पुणे : आइस्क्रीमच्या दुकानांतील प्लॅस्टिकचे चमचे... चहाची दुकाने, हॉटेलमधील प्लॅस्टिकचे ग्लास... फूड पॅकेट, भाजीविक्रेते, दुकानदार, मॉल... कपड्याची दुकाने पिशव्या... थर्मोकॉल डिश.. आदी विविध प्रकारचे तब्बल २५ टन प्लॅस्टिक महापालिकेने आतापर्यंत जप्त केले आहे. दोन दिवसांपासून प्लॅस्टिकबंदीची कारवाई तीव्र केली असून, एक-दोन वेळा सांगूनदेखील प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. सध्या केवळ प्रबोधन करणे व प्लॅस्टिक गोळा करण्याचे काम सुरू आहे; परंतु २३ एप्रिलनंतर थेट दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.
राज्य शासनाने प्लॅस्टिकबंदीचा कायदा केला आहे. मात्र, त्यानंतरही प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री होत असल्याचे आढळून आल्याने सोमवारपासून धडक कारवाईची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कोथरूड, येरवडा, हडपसर, मुंढवा, बीटी कवडे रोड, वडगाव धायरी, कोंढवा, येवलेवाडी, बावधान, भवानी पेठ या भागात ही कारवाई करण्यात आली. पहिल्या टप्प्यात या विक्रेत्यांकडील प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. आता पुढच्या टप्प्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेच्या केंद्रीय प्लॅस्टिकविरोधी पथकाचे प्रमुख व आरोग्य निरीक्षक प्रशांत कर्णे यांनी सांगितले.
कर्णे यांनी सांगितले, की दुकानदार स्वत:हून आपल्याकडे असलेले प्लॅस्टिक पॅक करून पथकाच्या हवाली करीत आहेत. काही आइस्क्रीम दुकानांमध्ये पॅकिंगसाठी प्लॅस्टिकच झाकण वापरावे लागत असल्याने पार्सल देणे बंद केल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी दुकानदारांना एक-दोन वेळा सांगूनदेखील वापर बंद करीत नसल्याचे निदर्शनास येते. अशा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
।मॉल, हॉटेल हे प्रमुख लक्ष्य
प्लॅस्टिकविरोधी कारवाईत प्रमुख विक्रेत्यांबरोबर शहरातील मोठे मॉल, हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते हे कारवाईचे प्रमुख लक्ष्य असेल. या ठिकाणी बंदी असतानाही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढळून येत असल्याने आता या ठिकाणांवर कारवाई जोमाने केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
।भाड्याने मिळतात कापडी पिशव्या
पुणेकरांची गरज लक्षात घेऊन काही दुकानदार, भाजीविक्रेत्यांनी जुन्या साड्यांच्या पिशव्या तयार केल्या आहेत. एखादे ग्राहक आम्हाला विकत पिशवी नको म्हणाले, तर चक्क ५ रुपये भाडे घेऊन कापडी पिशव्या ग्राहकांना देण्याची सोय पुण्यात सुरू झाली आहे. ग्राहक दुसºया दिवशी पिशवी घेऊन आल्यास पैसे परत दिले जातात.