अनधिकृत नळजोडांना आता ‘अभय’, इंदापूर नगर परिषदेची योजना , लाभ घेण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 02:36 AM2017-09-12T02:36:40+5:302017-09-12T02:36:45+5:30
इंदापूर : अनधिकृत नळजोड अधिकृत करून घेण्यासाठी इंदापूर नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाºया अभय योजनेचा लाभ जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी ...
इंदापूर : अनधिकृत नळजोड अधिकृत करून घेण्यासाठी इंदापूर नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाºया अभय योजनेचा लाभ जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी रामनिवास झंवर व पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष अमर गाडे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख सहदेव व्यवहारे यांनी केले आहे.
ते म्हणाले, की शहरातील एकूण मालमत्ताधारकांची संख्या साधारणत: आठ हजार आहे. त्या तुलनेत नळजोड अत्यंत कमी आहेत. ही आकडेवारी व्यस्त व असमाधानकारक असल्याचे नगरसेवकांच्या निदर्शनास आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालविण्यात येणारा पाणीपुरवठा विभाग त्यामुळे सतत तोट्यातच चालवावा लागत आहे. या विभागाचा खर्च भागविणे नगर परिषदेला अवघड होत चालले आहे.
पाणीपुरवठा विभागाचे उत्पन्न वाढविणे व पाण्याची चोरी, त्याचा अपव्यय टाळण्याकरिता अधिकृत नळांची संख्या वाढविण्याचा निर्णय नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे, असे सांगून ते म्हणाले, की नगर परिषदेचे मूळचे क्षेत्र व वाढीव हद्दीत नगर परिषदेची तपासणी पथके प्रत्येक घरोघरी फिरून मालमत्तेमध्ये असणाºया व नसणाºया नळजोडांची, मालमत्तेची माहिती घेत आहेत. मालमत्तेमध्ये नळजोड घेण्याची सूचना करीत आहेत. ज्या मालमत्ताधारकाकडील नळजोड अनधिकृत आहेत त्यांचे नळजोड अधिकृत करून घेण्यासाठी नगर परिषदेने, आठ दिवसांची अभय योजना राबविण्याची सूचना पाणीपुरवठा विभागास केली आहे. अवैध नळजोडधारकांनी आपले नळजोड अधिकृत करून घ्यावेत. त्यासाठी नगर परिषदेने आठ दिवसांची मुदत दिलेली आहे.
या मुदतीत जे अनधिकृत नळजोडधारक आपले नळजोड अधिकृत करून घेणार नाहीत. त्यांच्या घरी जाऊन नळजोडांची तपासणी करण्यात येणार आहे.
ते किती व्यासाचे आहे. केव्हापासून अनधिकृत आहे, याचा तपशील गोळा करण्यात येणार आहे. पंचनामा करून संबंधित अनधिकृत नळजोडधारकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतर ते नळजोड अधिकृत करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
मीटर बसवणार
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक नळजोडाला मीटर बसविण्याची मोहीम चालू करण्यात येणार आहे. त्यामध्ये अधिकृत असणा-या नळजोडांचा विचार होणार आहे. जे अनधिकृत नळजोडधारक या शोध मोहिमेतून राहतील किंवा स्वत:हून माहिती देणार नाहीत. अशांचे नळजोड बेकायदेशीर असल्याचे उघड झाल्यास, चोरून पाण्याचा वापर करणे अथवा अनधिकृत नळजोडांना पायबंद घालण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
...तर गुन्हे दाखल करणार
थकबाकीपोटी तोडलेले नळजोड विनापरवाना जोडून घेतले आहेत, त्यांच्यावर पाणीचोरी करणे, नगर परिषदेच्या मालमत्तेचे नुकसान करणे असे गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यांच्याकडून पाणी वापरत असल्याचे व घर बांधकाम चालू केल्याच्या दिवसापासून नळजोड पाणी वापराच्या बिलाच्या दहापट रक्कम वसूल केली जाईल. ही कटू कारवाई टाळण्यासाठी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.