देशाच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारची आव्हाने पेलण्यास सक्षम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 06:27 PM2019-05-29T18:27:54+5:302019-05-29T18:31:52+5:30
भारतीय लष्करात कुठल्याच प्रकारचे भेद पाळले जात नाहीत.
पुणे : भारतीय लष्करात कुठल्याच प्रकारचे भेद पाळले जात नाहीत. साहस, धैर्य आणि नेतृत्व गुणांचा विकास याठिकाणी होतो. राष्ट्रीय सुरक्षेत मोलाची कामगिरी करण्यासाठी तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी तर काहींनी पालकांपासून प्रेरणा घेत सशस्त्र दलात येण्याचा निर्णय घेतला, असे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील विविध शाखांमधुन प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांनी '' लोकमत'' शी बोलताना सांगितले. यावर्षी लष्करी पार्श्वभूमी बरोबरच सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांनी प्रबोधिनीच्या तीन वर्षाच्या काळात नेत्रदीपक यश प्राप्त केले. देशाच्या सागरी, हवाई आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून येत्या काळात सर्वप्रकारची आव्हाने आम्ही पेलण्यासाठी सक्षम झालो आहोत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
यावर्षी बीएसस्सी शाखेतून प्रथम येत कमांडन्ट सिल्व्हर मेडल आणि चीफ ऑफ आर्मी स्टाफचा मानकरी कॅडेट खिलानंद साहू ठरला. खिलानंद हा मूळचा छत्तीसगडमधील राजनांदगावचा आहे. त्याचे त्याचे आई-वडील दोन्ही शिक्षक आहेत. लहानपणी सैन्य दलांतील अधिकारी पाहायचो. त्यांचा थाट पाहून आपणही अधिकारी व्हावे असे वाटायचे. लष्करी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि वक्तशीरपणा पाहूनच लष्करात येण्याची इच्छा झाली, असे खिलानंद म्हणाला. सैन्य दलांमध्ये खूप काही शिकायला मिळते. स्वत: चा विकास तुम्ही उत्तम करु शकता. एनडीएमध्ये शिक्षकांनी आम्हाला घडवण्यासाठी मेहनत घेतली. या तीन वर्षात त्यांनी आमचे परिवर्तन यशस्वी लष्करी अधिकाऱ्यात केले आहे. वडिलांच्या प्रेरणेमुळे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत येण्याच्या पाठबळामुळे मी हे यश गाठू शकलो , असे खिलानंदने सांगितले.
यावर्षी पहिल्यांदाच प्रबोधिनीत बीटेक अभ्यासक्रम ठेवण्यात आला होता. या शाखेत नेव्हल कॅडेट देवाशीष सिंह देव याने प्रथम क्रमांक मिळवीला. देवाशीष हा मूळचा भुवनेश्वरचा आहे. त्याचे वडील अरुणकुमार सिंह देव हवाई दलात होते. देवाशीषने त्याचे शिक्षण केंद्रीय विद्यालयात पूर्ण केले. वडील हवाई दलात असल्याने हवाईदलातील अधिकाऱ्यांचे आयुष्य जवळून पाहिले. विमानतळाजवळ घर असल्याने विमाने उडताना पाहून आपणही वैमानिक व्हावे अशी लहानपणापासून इच्छा होती. अभ्यासात विशेष असा रस नव्हता तरीही शालेय जीवनात चांगले यश मिळवीले. एनडीएची परीक्षाही पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालो. तीन वर्षात कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे आणि शिक्षकांच्या प्रशिक्षणामुळे हे यश मिळवत आलो. वैमानिक व्हायचे स्वप्न जरी असले तरी, नौदलात अधिक संधी असल्याने नौदलात करिअर करणार असे देवाशिष म्हणाला.
बीएस्सी कम्प्युटर शाखेतून प्रथम येत कमांडन्ट सिल्व्हर मेडल मिळवणारा कॅडेट शिवकुमार चौहानचे वडील लष्करी अधिकारी होते. सुभेदार विजय कुमार हे २७ राजपूतांना रायफल्समधून निवृत्त झाले.लष्करात त्यांचा असलेला मान पाहून आपणही लष्करी अधिकारी व्हावे असे कायम वाटायचे. त्याचे सहकारी लष्करी अधिकारी यांचे शिस्तप्रिय आयुष्य मी जवळून पाहिले. यामुळे लष्करात येण्याची इच्छा ही आणखी प्रबळ झाली. बंगरूळ येथील सैनिकी शाळेत मी सहावीत दाखल झालो. यामुळे लष्करी प्रशिक्षण शालेय जीवनापासून अनुभवले. भविष्यात भारतीय लष्कराचा पर्याय निवडल्याने पुढील प्रशिक्षण देहरादून येतील आएमएमधून उच्चशिक्षण घेईल, असेही शिवकुमारने सांगितले.
--------------------