"तीन वर्षांच्या अनुभवाची अट रद्द करा", पुणे महापालिकेसमोर उमेदवारांचे आंदोलन
By राजू हिंगे | Published: March 19, 2023 06:51 PM2023-03-19T18:51:20+5:302023-03-19T18:51:32+5:30
सेवा प्रवेश नियमावलीमध्ये फायरमन या पदासाठी ३ वर्षांचा अनुभव आवश्यक
पुणे : पुणे महापालिकेने अग्निशामक दलातील बहुप्रतिक्षित फायरमन या पदाच्या २०० जागांची भरती सुरू केली आहे. अग्निशामक दलाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या तरुणांना इतर कोणत्याही ठिकाणी काम मिळत नसल्याने अनुभवाची अट अन्यायकारक आहे. त्यामुळे या पदासाठी तीन वर्षांच्या अनुभवाची अट रद्द केल्याशिवाय भरती प्रक्रिया राबवू नये, अशी मागणी करत उमेदवारांनी महापालिका भवनासमोर आंदोलन केले.
पुणे महापालिकेने नोकरभरतीच्या दुसऱ्या टप्प्यात ३४० जागांची भरती सुरू केली आहे, त्यात अग्निशामक दलातील २०० जागांचा समावेश आहे. सेवा प्रवेश नियमावलीमध्ये फायरमन या पदासाठी ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. पण अग्निशामक दलाचा सब ऑफिसर पाठ्यक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही अग्निशामक दलात काम करण्याची संधी मिळत नाही. राज्यातील महापालिकांमध्ये अनुभवाची अट असल्याने तेथेही उमेदवारांना काम करता येत नाही. अग्निशामक दलाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या तरुणांना इतर कोणत्याही ठिकाणी काम मिळत नसल्याने अनुभवाची अट अन्यायकारक आहे. त्यामुळे महापालिकेने ही अट काढून टाकावी व तोपर्यंत ही भरती प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी जन आंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक व महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमीतील प्रशिक्षणार्थी मनीष देशपांडे यांनी केली आहे.