गर्भपात गोळ्यांचे आॅनलाइन ‘दुकान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 08:43 PM2018-03-14T20:43:17+5:302018-03-14T20:43:17+5:30
पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनने तसे औषध मागवून, शेड्यूल्ड ड्र्गजच्या नियमाला कसे धाब्यावर बसविले जाते हे उघड केले आहे.
पुणे : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रीप्शन) गर्भपात गोळ्या (एमटीपी किट) वितरीत करण्यास बंदी आहे. असे असताना काही आॅनलाईन संकेतस्थळावर डॉक्टरांची चिठ्ठी नसली तरी सर्रास औषधे दिली जात आहेत. पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनने तसे औषध मागवून, शेड्यूल्ड ड्र्गजच्या नियमाला कसे धाब्यावर बसविले जाते हे उघड केले आहे. त्याबाबत संघटनेने अन्न आणि औषध प्रशासनाकडे (एफडीए) तक्रार केली आहे.
पुणे जिल्हा फार्मासिस्ट असोसिएशनचे सचिव विजय चेंगेडिया, प्रसन्न पाटील यांनी ही माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. गर्भपातासारखी औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देऊ नये असा अन्न आणि औषध प्रशासनाचा कायदा सांगतो. मात्र, त्यानंतरही आॅनलाईनच्या पळवाटेने गर्भपाताची औषधे सर्रास उपलब्ध होत आहेत. त्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही. केमिस्ट संघटनेने ओएमएसआयच्या संकेतस्थळावरुन ४९९ रुपयांचे हे किट वाहतुक खर्चासह अकराशे रुपयांत मिळविले आहे.
चेंगेडिया म्हणाले, राज्यासह शहरात एमटीपी किट डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय दिले जात नाही. मात्र, आॅनलाईन मागविल्यास तुम्हाला डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज उरत नाही. आॅनलाईनद्वारे परराज्यातून गर्भपात औषधे सहज उपलब्ध होत आहेत. काही आॅनलाईन औषध विक्री करणाऱ्या कंपन्या तर डॉक्टरांची चिठ्ठी देखील तयार करतात. त्यानुसार मागाल ते औषध मिळविण्याची सोय उपलब्ध झाली आहे. अशा कंपन्यांची ग्राहक सेवा केंद्र बेंगलोरला, फार्मासिस्ट मुंबईला, डॉक्टर म्हणून फोन येतो तो मुंबईवरुन अणि ग्राहक पुण्याचा अशी स्थिती असल्याचे चेंगेडिया म्हणाले.
गर्भपाताची औषधे अशी उपलब्ध होत असल्याने समाजाचे फार मोठे नुकसान होत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय अशी औषधे घेतल्यास संबंधित महिलेच्या जीवावर देखील बेतू शकते. त्यामुळे गर्भपाताच्या औषधांचे आॅनलाईन वितरण बंद करावे अशी मागणी चेंगेडिया यांनी केली आहे.