उन्हाळी सुट्टीनिमित्त ‘एसटी’च्या आरक्षणासाठी लगबग : पुणे विभागात १५० जादा बस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 11:48 AM2019-04-26T11:48:55+5:302019-04-26T11:50:21+5:30
शाळांच्या परीक्षा संपल्या असून उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे. तर महाविद्यालयांच्या परीक्षाही आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत.
पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातून उन्हाळी सुट्टीनिमित्त सोडण्यात येणाऱ्या जादा बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विभागातील सुमारे १५० जादा गाड्यांचे ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण झाले आहे. पुढील आठवडाभरात आरक्षणाचे प्रमाणे वेगाने वाढेल, अशी माहिती एसटीतील अधिकाऱ्यांनी दिली.
शाळांच्या परीक्षा संपल्या असून उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे. तर महाविद्यालयांच्या परीक्षाही आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. बहुतेक शाळांचे निकाल दि. ३० एप्रिल रोजी असतात. त्यामुळे दि. १ मेपासून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. त्यासाठी प्रामुख्याने एसटी प्रवासाला प्राधान्य दिले जाते. त्यासाठी पुणे विभागाने सुमारे १५० जादा बसचे नियोजन केले आहे. दि. १३ एप्रिलपासूनच नियोजन करण्यात आले असले तरी दि. २२ व २३ एप्रिल आणि दि. २८ व २९ एप्रिल रोजी निवडणुक कामासाठी बस द्याव्या लागणार असल्याने एसटी प्रशासन यामध्ये व्यस्त होते. आता एक टप्पा झाला असून दुसरा टप्पाही चार दिवसात संपले. त्यामुळे एसटीकडे सर्व बस प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत.
आतापर्यंत जादा बसचे ५० ते ५५ टक्के आरक्षण झाले आहे. प्रामुख्याने मराठवाडा भागात जाणाऱ्या बसला प्रतिसाद मिळत आहे. मावळ व शिरूर मतदारसंघातील मतदान झाल्यानंतर आरक्षण वाढत जाईल, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यातील १३ बसस्थानकांवरून जादा बस सोडण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे या बसस्थानकांवर उपलब्ध प्रवाशांची संख्या पाहून बस वाढविल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
-----------------
बस स्थानकनिहाय जादा गाड्या
शिवाजीनगर - जालना, बीड, धुळे, लातूर, मालेगाव, अकोला
स्वारगेट - तुळजापुर, बिदर, विजापुर, गुलबर्गा, गाणगापुर, पंढरपुर, दापोली
पिंपरी चिंचवड - लातुर, बीड, कोल्हापूर, सोलापूर, दापोली
सासवड - पंढरपुर, सातारा, नाशिक, औरंगाबाद
बारामती - औरंगाबाद, बीड, शिर्डी, सोलापुर, पंढरपुर, सातारा, दादर
एमआयडीसी - लातूर, बीड
तळेगाव - शिर्डी, नाशिक, औरंगाबाद, तुळजापुर
नारायणगाव - संगमनेर, नाशिक, शिर्डी, बार्शी, औरंगाबाद, त्र्यंबकेश्वर.
राजगुरूनगर - पैठण, धुळे, बार्शी, बीड.
शिरूर - औरंगाबाद, तुळजापुर, जालना, बीड
इंदापूर - धारूर, लातूर, कोल्हापूर, सांगली, पुणे, तुळजापुर, इचलकरंजी, परळी
दौंड - जळगाव, कोल्हापुर, औरंगाबाद
भोर - औरंगाबाद, नाशिक, पंढरपुर, महाड, कोल्हापूर
----------------