जिल्ह्यात दारापुढच्या लग्नात सर्रास ३०० ते ५०० वऱ्हाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:10 AM2021-04-07T04:10:42+5:302021-04-07T04:10:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य शासनाकडून कडक निर्बंध लागू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य शासनाकडून कडक निर्बंध लागू केले आहेत. परंतु आजही ग्रामीण भागात लग्न समारंभ धूमधडाक्यात सुरू असून, दारापुढे मंडप टाकून लग्नं लागत आहेत. या लग्नांमध्ये सर्रास ३००-५०० वऱ्हाडी हजेरी लावत आहे. पोलीस मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून काही ठिकाणी कारवाई करण्याऐवजी चार-पाच हजार रुपयांची मांडवली करून शेकडोंच्या उपस्थितीकडे काणाडोळा करत असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या एक महिन्यात शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येचा उद्रेकच झाला आहे. दोन-तीन हजारांच्या घरात असलेल्या रुग्ण संख्येने आता तब्बल बारा हजारांचा टप्पा क्रॉस केला आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. यात ग्रामीण भागात लग्न समारंभ व दशक्रिया विधीमध्ये शेकडो, हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहत असल्याचे लक्षात आल्यावर यावर देखील कडक निर्बंध घालत लग्नांसाठी ५० तर दशक्रिया विधीसाठी २० लोकांची अट घातली आहे.
गेल्या एक वर्षांपासून ही अट लागू असली तरी लोक काही केल्या ऐकत नसून आजही ग्रामीण भागात लग्नासाठी तीनशे-पाचशेच्या पटीत लोक उपस्थित राहतात. लग्न एखाद्या सभागृहात न करता नवरा किंवा नवरीच्या घरासमोर मंडप टाकून समारंभ अत्यंत धूमधडाक्यात केला जात आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातच दारापुढे लग्नाची जुनी पद्धत पुन्हा सुरू झाली आहे. परंतु या दारापुढच्या लग्नात वऱ्हाड्यांच्या उपस्थितीकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. ही बाब जिल्ह्यात कोरोनाचा आणखी उद्रेक होण्यास कारणीभूत ठरू शकते.