पीएमपीवर ७० कोटींची पालिकेकडून मेहेरबानी
By admin | Published: November 18, 2014 03:29 AM2014-11-18T03:29:40+5:302014-11-18T03:29:40+5:30
पीएमपीच्या स्थापनेला ७ वर्षे झाली, तरी अद्याप कारभार सक्षम झालेला नाही. दरदिवशी तोटा वाढत आहे. त्यामुळे पीएमपीने सीएनजी ठेकेदारांची बिले थकविली होती.
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचाऱ्यांच्या पगारातील फरक व आर्थिक तूट भरून काढण्यासाठी तब्बल ७० कोटी निधी देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने आज मंजुरी दिली. पीएमपीचा कारभार सुधारण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करण्याऐवजी वेळोवेळी आवश्यक निधी देऊन महापालिकेने पीएमपीच्या प्रशासनावर मेहेरबानी सुरू केल्याची चर्चा आहे.
पीएमपीच्या स्थापनेला ७ वर्षे झाली, तरी अद्याप कारभार सक्षम झालेला नाही. दरदिवशी तोटा वाढत आहे. त्यामुळे पीएमपीने सीएनजी ठेकेदारांची बिले थकविली होती. वेळेत थकबाकी दिली नाही, तर सीएनजी पुरवठा बंद करण्याचे पत्र पीएमपी प्रशासनाला दिले.
त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सीएनजी बिले व आर्थिक तूट भरून काढण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्यास मान्यता दिली. दरम्यान, पीएमपी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम अनेक वर्षे दिलेली नाही. महापालिकेच्या अर्थसंकल्पात कर्मचाऱ्याच्या फरकासाठी २७ कोटींची तरतूद होती. उर्वरित २३ कोटी अखर्चिक रक्कम मिळून साधारणत: ५० कोटींची रक्कम देण्याच्या ठरावाला स्थायी समितीने आज मान्यता दिली, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे यांनी आज दिली. (प्रतिनिधी)