सौरऊर्जेच्या वापराबाबत पुणेकर उदासीनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 04:04 AM2017-08-01T04:04:25+5:302017-08-01T04:04:25+5:30
जगभरात सगळीकडे व देशातही सौरऊर्जेच्या वापराची गती वाढत असली, तरी पुणेकर मात्र त्या संदर्भात उदासीनच दिसत आहेत. महापालिकेने अलीकडेच प्रकाशित केलेल्या पर्यावरण अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
पुणे : जगभरात सगळीकडे व देशातही सौरऊर्जेच्या वापराची गती वाढत असली, तरी पुणेकर मात्र त्या संदर्भात उदासीनच दिसत आहेत. महापालिकेने अलीकडेच प्रकाशित केलेल्या पर्यावरण अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
सौरऊर्जेचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकारकडूनही प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय आहे. महापालिकेनेही यात आपला प्रयत्न म्हणून काही वर्षांपासून सौरऊर्जेचा वापर करणाºयांना मिळकत करामध्ये सवलत देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, फक्त एवढेच करून या ऊर्जेचा वापर वाढावा, यासाठीच्या प्रचाराकडे महापालिकेने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात सौरऊर्जेचा वापर करणाºयांची संंख्या वेगाने वाढणे अपेक्षित असताना तसे दिसत नाही.
दहा वर्षांपूर्वी सौरऊर्जेचा वापर करणाºयांची संख्या फक्त १ हजार २६५ होती. आता सन २०१७ मध्ये ती ५७ हजारांच्या आसपास आहे. पुणे शहरातील मिळकतींची संख्या साधारण ८ लाख २५ हजार इतकी आहे. त्यांपैकी केवळ ५७ हजार मिळकती सौरऊर्जेचा वापर करतात, असे पर्यावरण अहवालावरून दिसते. या सर्वांना मिळकत करामध्ये सवलत देण्यात येत असली, तरी त्यांनी सौरऊर्जा म्हणून बसवलेल्या उपकरणांची प्रत्यक्ष पाहणी करणारी यंत्रणाच पालिकेकडे नाही.