मराठी प्रेक्षकांमध्ये भाषाभिमानाचा अभाव : सुबोध भावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 06:31 PM2018-05-26T18:31:32+5:302018-05-26T18:31:32+5:30
ज्या मराठी माणसाने भारतीय चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली. त्या भाषेतील चित्रपट 'या आणि पाहा' असे म्हणत प्रेक्षकांच्या भिका-यासारखा दारात उभा आहे.
पुणे : मराठी चित्रपटांना हिंदी आणि हॉलिवूडच्या चित्रपटांशी स्पर्धा करावी लागत आहे. ज्या मराठी माणसाने भारतीय चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली त्या भाषेतील चित्रपट 'या आणि पाहा' असे म्हणत भिका-यासारखा प्रेक्षकांच्या दारात उभा आहे. दक्षिणेकडच्या राज्यातील प्रेक्षकांच्या तुलनेत मराठी प्रेक्षकांमध्ये भाषभिमानाचा अभाव जाणवत असल्याची खंत प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक सुबोध भावे याने व्यक्त केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्टा उपक्रमात सुबोध भावे याच्याशी संवाद साधण्यात आला. संघाचे अध्यक्ष शैलेश काळे आणि सरचिटणीस दिगंबर दराडे या वेळी उपस्थित होते.
चित्रपट हे आधी मनोरंजनाचे माध्यम आहे. पण, सामाजिक विषयांची मांडणी करून त्याने प्रबोधन केले पाहिजे अशी अतिरिक्त जबाबदारी आपण विनाकारण मराठी चित्रपटांवर सोपविली आहे. मराठी माणसाशी आणि मातीशी नाळ जोडलेले विषय असतील तरच मराठी चित्रपट यशस्वी होतील असा विश्वासही त्याने व्यक्त केला. 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाने अमराठी भाषकांना अभिजात संगीत आणि नाट्यसंगीताची गोडी लावली. त्यामुळे चांगला चित्रपट अमराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे हे उद्दिष्ट आहे. त्यांना चित्रपट पाहायचा असेल तर मराठीकडे वळावे लागेल,असेही त्याने स्पष्ट केले.
'पुष्पक विमान' या चित्रपटाची कथा आणि निर्मिती माझी असून त्यात भूमिकादेखील करत आहे. 'चोटा चेतन'च्या धर्तीवर बालचित्रपटाची निर्मिती आणि शंकर महादेवन यांच्यासमवेत एका चित्रपटाची निर्मिती करीत असल्याचे सुबोध भावे याने सांगितले.