पुढच्या महिन्यात मिळेल मुबलक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:11 AM2021-05-23T04:11:36+5:302021-05-23T04:11:36+5:30
पुणे : सध्या लसींचा तुटवडा जाणवत आहे. पण जूननंतर लसींच्या उपलब्धतेचा प्रश्न सुटेल, असा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र ...
पुणे : सध्या लसींचा तुटवडा जाणवत आहे. पण जूननंतर लसींच्या उपलब्धतेचा प्रश्न सुटेल, असा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पुण्यामध्ये आज फडणवीस यांचा हस्ते नायडू रुग्णालयातील ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान सध्या सुरू असलेल्या गोंधळावर सर्वांनी मिळून मार्ग काढणे आवश्यक असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पुण्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये म्हणून नवीन ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटची निर्मिती करण्यात येत आहे. महापालिका उभारत असलेल्या ८ ऑक्सिजन प्लांटपैकी नायडू रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन आज एका ऑनलाइन कार्यक्रमात फडणवीस यांचा हस्ते करण्यात आले. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल आदी उपस्थित होते.
फडणवीस यांनी महापालिकेच्या कामाचे कौतुक केले. तसेच लसींचा तुटवडा जून महिन्यात संपेल, असाही दावा केला. फडणवीस म्हणाले, "या लाटेत सर्वात जास्त ऑक्सिजनची कमतरता आपल्याला जाणवली. सर्व ऑक्सिजन वैद्यकीय कारणासाठी द्यावा लागला. प्रशासनाला तणावात राहावे लागत होते. मोदींनी ऑक्सिजनची नीट व्यवस्था लावली. प्लांट इम्पोर्ट करणे हा त्यावरचा मार्ग होता आणि हे केले. त्याबद्दल महापालिकेचे अभिनंदन. पंतप्रधानांचा पुढाकाराने ८०० ऑक्सिजन प्लांटची निर्मिती होते आहे. या लाटेत सर्वाधिक परिणाम झालेल्या ठिकाणांमध्ये पुणे होतं. पुण्याने इतका ताण असूनही टेस्टिंग कमी होऊ दिलं नाही. आत्ता संख्या आटोक्यात आली तरी तिसऱ्या लाटेची तयारी करावी लागेल. केंद्र सरकार लसीकरणाचा कार्यक्रम करत आहे. राज्य त्यात भर घालत आहे आणि महापालिका त्यात भर घालेल याची आम्हाला खात्री आहे. जूननंतर ही लस उपलब्धतेची परिस्थिती सुधारेल."
महापौर मुरलीधर मोहोळ सांगितले, "मध्यंतरी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. आता ऑक्सिजन संपतो का काय, अशी भीती जाणवायला लागली. त्यानुसार ८ ऑक्सिजन प्लांट शहरात तयार केले आहेत. थेट अमेरिकेतून या ऑक्सिजन प्लांटसाठी साहित्य आणले आहे. पुढची लाट आलीच तर महापालिका आत्मनिर्भर होणार आहे."