सराईत गुन्हेगाराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हडपसर परिसरातील घटना
By नितीश गोवंडे | Updated: March 21, 2024 15:49 IST2024-03-21T15:49:03+5:302024-03-21T15:49:44+5:30
मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला

सराईत गुन्हेगाराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हडपसर परिसरातील घटना
पुणे: ओळखीचा गैरफायदा घेऊन एका सराईत गुन्हेगाराने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. यातून ती गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार जानेवारी २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत हडपसर परिसरातील शिंदे वस्ती येथे घडला आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून तो सध्या अमरावती जेलमध्ये आहे.
याप्रकरणी १७ वर्षीय पीडित मुलीने बुधवारी (दि. २०) हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून तुषार कैलास काकडे (२०, रा. हडपसर) याच्यावर बलात्कारासह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहत असल्याने ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने पीडित मुलीसोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी तुषार काकडे हा दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह कोयता, चाकू या सारख्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. तत्कालीन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपी तुषार काकडे याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करत त्याला एक वर्षासाठी अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कविराज पाटील करत आहेत.