१५ दिवस डांबून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; वेश्या व्यवसाय करण्यासही भाग पाडले, पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 03:34 PM2024-02-15T15:34:47+5:302024-02-15T15:38:19+5:30
वडिलांच्या आजारपणासाठी घेतलेले ३० हजार मुलगी परत करू शकली नाही, म्हणून शेजारील जोडप्यांनी तिचे अपहरण करून वेश्या व्यवसाय करण्यासही भाग पाडले
धनकवडी (पुणे) : दिवस बुधवारचा. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन. तिथला फोन खनाणतो आणि माहिती मिळते की, के के मार्केट परिसरातील लॉजवर एका मुलीला डांबून ठेवण्यात आलय. पोलीस तिथे पोहोचतात. लॉज मधून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका करतात. त्यानंतर तिच्याकडे केलेल्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येते. मागील ६ महिन्यांपासून या मुलीवर सतत बलात्कार करण्यात आलाय. तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात होतं. तिच्या घराजवळ राहणाऱ्या एका जोडप्यानेच तिला हे सर्व करण्यास भाग पाडलं होतं.
विश्रांतवाडी परिसरात राहणारी १७ वर्षाची तरुणी, वडिलांना दारूचे व्यसन होते. तसेच ते सतत आजारी असायचे. त्यामुळे वडिलांचे उपचारासाठी तिने घराशेजारीच राहणाऱ्या आकाश माने आणि पुनम माने या जोडप्याकडून तीस हजार रुपये उसने घेतले होते. मात्र हे पैसे ती परत करू शकली नाही. त्यामुळे या दोघांनी या मुलीचे अपहरण केलं. त्यानंतर के के मार्केट परिसरातील लॉजवर डांबून ठेवलं. आकाश माने याने तिच्यावर बलात्कार केला. आणि इतक्यावरच थांबला नाही तर तिला जबरदस्तीनं वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं. पुणे शहरातील ग्राहक शोधून तो तिला वेगवेगळ्या लॉजवर पाठवत राहिला. आणि हा संपूर्ण प्रकार मागील 6 महिन्यांपासून सुरू होता.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पुनम माने या महिलेला अटक केली. तर तिचा पती आकाश माने सध्या फरार आहे. याशिवाय या संपूर्ण प्रकरणात पीडित मुलीला ज्या ज्या लॉजवर नेण्यात आलं होतं ते ते लॉज मालक सुद्धा पोलिसांच्या रडारवर आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील तपास करत आहेत.