पुण्यात दारू पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मित्रांसह मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 13:26 IST2024-08-21T13:26:05+5:302024-08-21T13:26:53+5:30
चार महिन्यानंतर तरुणीच्या वागणुकीत बदल दिसू लागल्यामुळे घरच्यांनी तिला प्रश्न विचारला असता हा सगळा प्रकार समोर आला

पुण्यात दारू पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मित्रांसह मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल
किरण शिंदे
पुणे : अल्पवयीन तरुणीवर मैत्रिणीच्या मदतीने २ मित्रांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील नाना पेठेत घडली आहे. अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन तरुणांना समर्थ पोलिसांनी ताब्यात घेतेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार एप्रिल महिन्यात घडला आहे. पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण हे घराजवळ राहतात. त्यामुळे त्यांची पहिल्यापासूनच ओळख होती. आरोपी मैत्रिणी हिने तरुणीला घेऊन तिच्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी नेले. मैत्रिणीने तिच्या मित्रांना सुद्धा पार्टीसाठी बोलवले होते. मित्राच्या घरी हा सगळा प्रकार घडला. पार्टीच्या ठिकाणी गेल्यावर तरुणीला तिच्या मैत्रिणीने जबरदस्तीने तिला दारू पाजली. त्यानंतर तिच्या मित्रांनीच तिच्यावर बलात्कार केला. दारूच्या नशेत असलेल्या तरुणीला या सगळ्या बाबत काहीच कल्पना नव्हती. याचाच फायदा घेत एका तरुणाने या ठिकाणी या घटनेचा व्हिडिओ देखील मोबाईलवर रेकॉर्ड केला
चार महिन्यानंतर तिच्या वागणुकीत बदल दिसू लागल्यामुळे घरच्यांनी तिला प्रश्न विचारला असता हा सगळा प्रकार समोर आला. तरुणीच्या वडिलांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. यावरून समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अल्पवयीन तरुण आणि इतर मित्रांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.