आळंदीत संगीत शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 14:03 IST2025-03-05T14:02:31+5:302025-03-05T14:03:41+5:30

इंद्रायणी नगर परिसरात एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत पंधरा वर्षीय विद्यार्थ्यांचे संगीत विषयाच्या शिक्षकाने लैंगिक शोषण केले आहे

abuse of minor students by concerned music teacher Both were arrested | आळंदीत संगीत शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण; दोघांना अटक

आळंदीत संगीत शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण; दोघांना अटक

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीतील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत पुन्हा एकदा अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण झाल्याची घटना उघड झाली आहे. देहू फाटालगतच्या इंद्रायणी नगर परिसरात एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत पंधरा वर्षीय विद्यार्थ्यांचे संगीत विषयाच्या शिक्षकाने लैंगिक शोषण केले आहे. याप्रकरणी संगीत शिक्षक गौरव माळी (वय २१) व संबंधित संस्था चालक महेश नरोडे (वय २७) या दोघांवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
        
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नगर परिसरातील आनंदाश्रम वारकरी शिक्षण संस्थेत जानेवारी महिन्यात हा प्रकार घडला. संगीत विषयाच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थ्याकडे शरीर सुखाची मागणी केली. घाबरलेल्या विद्यार्थ्याने संस्थाचालकाला ही बाब सांगितली. मात्र त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही. अखेर विद्यार्थ्याने दिघी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी संबंधित दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
                
वारकरी सांप्रदायाचे शिक्षण देऊन विद्यार्थी घडविणारे ठिकाण म्हणून आळंदीची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. आळंदी शहरासह आसपासच्या गावांमध्ये जवळपास तीनशेहून अधिक खाजगी वारकरी शिक्षण संस्था कार्यरत आहेत. मात्र अशा खाजगी वारकरी शिक्षण संस्थांमध्ये थेट विद्यार्थ्यांवरच संस्थाचालक किंवा त्याच्या नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचार होत असल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. दीड महिन्यांपूर्वी एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत दोन अल्पवयीन मुलांवर पाहुणा म्हणून आलेल्या एकाने लैंगिक अत्याचार केले. तर महिन्याभरापूर्वी एका महाराजाकडून अल्पवयीन तेरा वर्षाच्या मुलीचा विनयभंग करण्यात आला होता. या वाढत्या घटनांमुळे तीर्थक्षेत्र आळंदीची बदनामी होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. 
            
 यापार्श्वभूमीवर समस्त आळंदीकरांनी एकत्रित येत 'सर्व खाजगी वारकरी शिक्षण संस्था बंद कराव्यात' असा ठराव एकमताने मंजूर करून संबंधित विभागाला लेखी निवेदन दिलेले आहे. विशेषतः आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर ४८ तासात कारवाई करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानुसार प्रशासनाने आळंदी तसेच लगतच्या सर्व गावांमधील खाजगी शिक्षण संस्थांचा विशेष पथकाद्वारे सर्वे करून महिला व बाल विकास विभागाला अहवाल सादर केला आहे. 
            
विशेष म्हणजे या सर्व्हेमध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर आली होती. आळंदीतील अनेक खाजगी वारकरी शिक्षण संस्था महिला व बालविकास परवानगीविना सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. तर अनेक खाजगी वारकरी शिक्षण संस्थांमध्ये सुविधांचा वाणवा असल्याचे लक्षात आले आहे. दरम्यान या सर्वेचा अहवाल सादर करून जवळपास पंधरा ते वीस दिवस झाले आहेत. मात्र अद्याप संबंधित खाजगी वारकरी शिक्षण संस्थांवर कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई झालेली नाही.

Web Title: abuse of minor students by concerned music teacher Both were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.