संतापजनक ! पुण्यात शिक्षकाचे १२ अल्पवयीन विद्यार्थिंनींसोबत गैरवर्तन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 06:24 PM2019-05-16T18:24:51+5:302019-05-16T18:28:21+5:30
अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पुण्यात शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला असून शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
पुणे : अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पुण्यात शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला असून शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित व्यक्ती लोहगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहे. या व्यक्तीने शिक्षक असल्याचा गैरफायदा घेऊन १२ अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केले. मागील काही महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. शाळेतील मधल्या सुट्टीतील वेळात मुलींना जवळ बोलावून त्यांच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले. इतकेच नव्हे तर घडला प्रकाराविषयी कुठेही वाच्यता करू नये म्हणून त्यांना धमकावण्यातही आले. अखेर विद्यार्थींनी या प्रकाराची पालकांना कल्पना दिल्यावर त्यांनी शाळा प्रशासनकडे तक्रार केली. त्यावर गटविकास आणि गटशिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्यात तथ्य आढळल्यावर शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. विद्यार्थिनींच्या सांगण्यानुसारअनेक महिने हा प्रकार शाळेत सुरु होता. मग ही बाब इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात कशी आली नाही याविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.
या विषयी पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सुनील कुराडे म्हणाले की, 'जिल्हा प्रशासनाने या प्रकारणाची गंभीर दखल घेतली आहे. सध्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला असून दोषी शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात येईल' .