Pune: घरी मुक्कामी येऊन नातेवाइकानेच केला अत्याचार; आरोपीला ठोठावली २० वर्षे सक्तमजुरी
By नम्रता फडणीस | Published: July 25, 2023 07:18 PM2023-07-25T19:18:27+5:302023-07-25T19:19:47+5:30
मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला घरच्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पोटदुखीच्या गोळ्या दिल्या...
पुणे : ‘तो’ मुलीचा नातेवाईक. कामानिमित्त घरी मुक्कामी आल्यानंतर तो अल्पवयीन मुलीवर अत्याचार करायचा. नात्यातीलच मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या या आरोपीला न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम मुलीला देण्यात यावी, असा निकाल सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी दिला.
जानेवारी ते डिसेंबर २०१६ दरम्यान मुलीच्या घरात हा प्रकार घडला. याबाबत १५ वर्षीय मुलीच्या वडिलांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. मुलीची आई दिव्यांग आहे. तसेच ती आजारी असल्याने मुलीने हा प्रकार घरी सांगितला नव्हता, असे फिर्यादीत नमूद आहे.
खटल्याची सुनावणी सुरू असताना मुलीने फितूर होण्याचा प्रयत्न केला. सरतपासणीत तिने तिच्यावर झालेला अत्याचार न्यायालयास सांगितला. मात्र, उलट तपासणीमध्ये तिने तिचे वय जास्त आहे, आरोपीचे नाव चुकीचे आहे, असे सांगितले. मात्र, त्यावर सरकारी वकील मारुती ॲड. वाडेकर यांनी युक्तिवाद करीत, ‘मुलीने आरोपीला न्यायालयात ओळखले होते. आरोपीला टोपण नाव असू शकते. तसेच मुलीचे वय १६ पेक्षा कमी असल्याचे न्यायालयात दाखल असलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
या खटल्याचे कामकाज सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी पाहिले. त्यांना सरकारी वकील संध्या काळे आणि अरुंधती ब्रह्मे यांनी मदत केली. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक आर. पी. कुलथे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे निकालात नमूद आहे.
मुलीच्या प्रसूतीनंतर प्रकार उघडकीस
२१ डिसेंबर २०१६ ला मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला घरच्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पोटदुखीच्या गोळ्या दिल्या. मात्र, त्यानंतरदेखील तिला त्रास होत होता. त्यानंतर सकाळी १०च्या सुमारास अचानक तिची प्रसूती झाली. प्रसूती झाल्यानंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात असताना तिने घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. तेव्हा सर्व प्रकार उघडकीस आला.