महिलेशी अश्लील कृत्य करत शिवीगाळ, कारचालकावर गुन्हा; कल्याणीनगर भागातील घटना
By नितीश गोवंडे | Published: December 9, 2024 07:20 PM2024-12-09T19:20:54+5:302024-12-09T19:20:54+5:30
कल्याणीनगर परिसरातील मेट्रो पुलाजवळ भरधाव वेगाने आलेल्या कारने तक्रारदाराच्या महिलेच्या कारला धडक दिली.
पुणे : कारच्या धडकेत आरसा तुटल्याने जाब विचारणाऱ्या कारचालक आणि त्याच्या पत्नीला शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना कल्याणीनगर भागात घडली. याप्रकरणी कार चालकाविरोधात विनयभंग, तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी एका कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि तिचे पती कल्याणीनगर भागातून रविवारी (दि. ८) रात्री साडेआठच्या सुमारास कारने निघाले होते. कल्याणीनगर परिसरातील मेट्रो पुलाजवळ भरधाव वेगाने आलेल्या कारने तक्रारदाराच्या महिलेच्या कारला धडक दिली. धडकेत त्यांच्या कारचा आरसा तुटला. त्यामुळे महिलेच्या पतीने कार चालकाला जाब विचारला. कार चालकाने रस्त्यात वाद घालण्यास सुरुवात केली. कार रस्त्यात आडवी लावली.
त्याने कार चालकाला धक्काबुक्की केली. शिवीगाळ करणाऱ्या आरोपी कार चालकाला समजावण्यासाठी महिला कारमधून उतरली तेव्हा आरोपीने तिच्याशी अश्लील कृत्य करून शिवीगाळ, तसेच धक्काबुक्की केली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश लामखेडे करत आहेत.