कोलकत्यातील डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा ‘अभाविप - जिज्ञासा’ कडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 05:02 PM2019-06-16T17:02:46+5:302019-06-16T17:07:38+5:30
काेलकत्यात डाॅक्टरला करण्यात आलेल्या मारहाणीचा अभाविपा- जिज्ञासाकडून पुण्यात निषेध
पुणे : कोलकात्यातील सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना १० जून रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा ‘अभाविप - जिज्ञासा’ कडून रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र येथे निषेध करण्यात आला. यावेळी ‘ममता तुमने क्या दिया, बंगाल को बदनाम किया! ममता सरकार होश में आओ’, या घोषणेसह ममता सरकारचा तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात आला.
डॉक्टरांचा संप आणि त्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांना कामावर रुजू व्हा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा दिला. डॉक्टरांना झालेली मारहाण आणि ममता सरकारची वाढती अतिरेकी भूमिका या घटनेच्या निषेधार्थ अभाविप देशभरातील वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी व डॉक्टरांना घेऊन निषेध व्यक्त करत असून, अभाविप त्या सर्व आंदोलक विद्यार्थी व डॉक्टरांच्या पाठीशी उभी आहे.
यावेळी अभाविप पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी निषेध व्यक्त करतानाच, ममता सरकारच्या निर्दयी भूमिकेवर ताशेरे ओढून केंद्र सरकारने या विषयात लक्ष घालण्याची मागणी केली. ममता सरकारने डॉक्टरांवर झालेल्या अत्याचाराबाबत तात्काळ माफीनामा द्यावा, अशी यावेळी मागणी करण्यात आली. यावेळी अभाविप जिज्ञासा महाराष्ट्र संयोजक अक्षय लोणकर, सहसंयोजक स्वप्नाली बवरे, पुणे महानगर प्रमुख ऋत्विक नांदे, सह प्रमुख नम्रता परुळेकर, देवश्री खरे, स्नेहा पाटील व अन्य २३७ वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी उपस्थित होते.