पुणे विद्यापीठामध्ये अभाविपचा 'राडा'; व्यवस्थापन परिषदेत घुसून केले आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 01:36 PM2021-02-22T13:36:49+5:302021-02-22T14:46:01+5:30
अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात ठिय्या आंदोलन करत विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याच्या घोषणा दिल्या.
पुणे: कोरोना काळात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून आकारलेले परीक्षा शुल्क परत करावे. या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी सोमवारी विद्यापीठात सुरू असलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून आंदोलन केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा जाहीर निषेध करत आहे. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील सभागृहात घेतली जात आहे. ही बैठक सुरू असताना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात ठिय्या आंदोलन करत विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याच्या घोषणा दिल्या.
यावेळी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये कोणत्याही विद्यार्थी हिताच्या विषयांवर चर्चा नाही. गेली ६ महिने परीक्षा शुल्क परत करण्यासाठी विद्यार्थी आंदोलन करत आहे. त्याच्यावर अजून कोणताही निर्णय नाही.विद्यापीठाच्या स्वायत्तेवरती शासनाकडून गदा आणली जात आहे. आणि विद्यापीठ यावर गप्प आहे. विद्यार्थ्यांच्या पैशांवर राजकीय कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.विद्यापीठाने परीक्षा शुल्क परत करण्याविषयी या बैठकीत निर्णय करावा अन्यथा ही बैठक करण्याचा अधिकार नाही, अशा मागण्या अभाविपतर्फे करण्यात आल्या.