चार्जिंग नसल्याने ‘पीएमपी’च्या ई-बसचा एसी बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 02:00 PM2019-12-11T14:00:18+5:302019-12-11T14:01:08+5:30

प्रवाशांना फुटतोय घाम 

AC off of PMP e-bus closed due to no charging | चार्जिंग नसल्याने ‘पीएमपी’च्या ई-बसचा एसी बंद

चार्जिंग नसल्याने ‘पीएमपी’च्या ई-बसचा एसी बंद

Next
ठळक मुद्दे‘पीएमपी’च्या ताफ्यात सध्या सुमारे १२५ ई-बस आहेत.

पुणे : धावत्या इलेक्ट्रिक बसमधील वातानुकूलित यंत्रणा (एसी) बंद ठेवल्याने प्रवाशांची घुसमट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. चार्जिंग पुरेसे नसल्याने एसी बंद ठेवला जात असल्याचे कारण चालकांकडून दिले जात असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही पूर्ण चार्जिंग नसताना बस मार्गावर आणण्यात येत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
‘पीएमपी’च्या ताफ्यात सध्या सुमारे १२५ ई-बस आहेत. या बसची चार्जिंग स्टेशन भेकराईनगर व निगडी आगारामध्ये आहेत. तीन ते चार तासांच्या चार्जिंगनंतर त्या किमान २२५ किलोमीटर धावतात. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी बस चार्जिंग केल्या जातात. पण चार्जिंग स्टेशन कमी असल्याने दिवसाही काही बसची बॅटरी चार्जिंग करावी लागते. परिणामी एका वेळी सर्व बस मार्गावर येऊ शकत नाही. त्यातच आता चार्जिंगअभावी बसमधील एसी बंद असल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. पीएमपी प्रवासी मंचचे सचिव संजय शितोळे यांना दोन दिवस अनुभव आला. सोमवारी थरमॅक्स चौक ते लांडेवाडी या मार्गावर ई-बसमधून प्रवास करताना एसी बंद होता. संबंधित वाहकास प्रश्न विचारले असता चार्जिंग कमी आहे, ३० टक्केच आहे असे सांगितले. मंगळवारी सकाळी शिवाजी चौक ते कासारवाडी असा प्रवास करत असताना पुन्हा तोच अनुभव आला. संबंधित वाहकानेही चार्जिंग कमी असल्याचा दावा केला. त्यानंतर ही बस थांबवून दुसरी बस बोलवा, असा आग्रह केल्यावर एसी चालू केला. पण कुलिंग सिस्टिम बंदच करून फक्त फॅन चालू ठेवले. एसी बंदप्रमाणेच बसचे डिजिटल फलक, उद्घोषणा यंत्रणाही बंद असतात. याबाबत तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याचे शितोळे म्हणाले.
........
प्रवाशांना श्वास घेण्यास अडचणी 
एसी बंद ठेवल्यानंतर बसमध्ये हवा खेळती राहत नाही. दमटपणा वाढून बसमधील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊ शकते. प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. पण याकडे दुर्लक्ष करून चालकांकडून संपूर्ण एसी बंद ठेवण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे ज्येष्ठ, आजारी, श्वसनाचा त्रास असलेल्या प्रवाशांच्या जीवावरही बेतू शकते. त्यामुळे अर्धवट चार्जिंग असताना बस मार्गावर सोडण्याचा धोका पीएमपीने पत्करू नये, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Web Title: AC off of PMP e-bus closed due to no charging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.