एसी बंदने शिवशाहीत जीव टांगणीला : प्रवाशांना मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 09:03 PM2019-12-20T21:03:16+5:302019-12-20T21:11:28+5:30
खेड-शिवापुर टोलनाका येईपर्यंत एसी सुरू न झाल्याने प्रवाशांची घुसमट
पुणे : सांगलीला जाणारे प्रवासी तिकीट काढून बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये चढले. बस निघाल्यानंतर एसी बंद असल्याचे समजले. याबाबत चालकाला हटकल्यानंतर एसी बंद असून पुढे काही वेळातच दुरूस्ती केली जाईल, असे सांगितले. पण खेड-शिवापुर टोलनाका येईपर्यंत एसी सुरू न झाल्याने प्रवाशांची घुसमट झाली. अखेर दुसऱ्या शिवशाहीने प्रवाशांना रवाना करण्यात आले. या प्रकारामुळेप्रवाशांना सात तासांचा प्रवास घडला.
आरामदायी वातानुकूलित शिवशाही बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. पण या बसबाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारीही समोर येत आहेत. एसटीच्या ताफ्यात शिवशाही दाखल झाल्यापासून सातत्याने अपघात घडत आहेत. तसेच काही तांत्रिक बिघाडामुळे वातानुकूलित यंत्रणा बंद पडण्याचे प्रकारही घडत आहेत. शुक्रवारी सांगलीला जाणाऱ्या प्रवाशांचा याचा अनुभव आला. ही बस स्वारगेट बसस्थानकातून दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास सुटली. पण बस निघण्यापूर्वीच वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. त्यांना चालकाला एसी सुरू करण्याची विनंती केली. पण या यंत्रणेची एक वायर तुटली असून कात्रजच्या पुढे ती लगेच जोडून एसी सुरू केला जाईल, असे चालकाने सांगितले. या उत्तरावर प्रवासीही निशब्द झाले. एसी यंत्रणेमुळे बसच्या सर्व काचा, दरवाजा बंद होते. केवळ छतावर हवेसाठी थोडी जागा खुली केली होती. पण ती पुरेशी नव्हती. त्यामुळे प्रवाशांची घुसमट सुरू झाली.
बस कात्रजमध्ये गेल्यानंतर तिथे थांबलेल्या व्यक्तीनेही दुरूस्तीस नकार दिला. त्यामुळे बस थांबवत-थांबवत शिंदेवाडीपर्यंत नेण्यात आली. तिथे एसी लगेच दुरूस्त होणार असल्याचे समजले. त्यामुळे प्रवाशांना तिथेच उतरविण्यात आले. काही वेळाने मागून दुसरी शिवशाही आली. त्या बसमध्ये चढल्यानंतर त्याचाही एसी बंद होता. त्यामुळे पुन्हा प्रवाशांना खाली उतरावे लागले. मग प्रवाशांना आधीच्याच बसमध्ये बसवून खेड-शिवापुर टोलनाक्यापर्यंत नेण्यात आले. तिथे पुन्हा प्रवाशांना खाली उतरवून दुसºया बसची वाट पाहावी लागली. काही वेळाने आलेल्या शिवशाहीमध्ये प्रवासी गेले. यामध्ये तब्बल दोन तासांचा वेळ गेला. दरवेळी पाच तासात पोहचणाºया बसला शुक्रवारी सात तास लागले.
.......
ही प्रवाशांची फसवणूक
सांगलीमध्ये पतीच्या तपासणीसाठी सायंकाळी पाच वाजताची डॉक्टरांची वेळ घेतली होती. पण दोन तास विलंब झाला. बसमध्ये एसी बंद असताना याबाबत प्रवाशांना कल्पना न देता तिकीटे देण्यात आली. ही प्रवाशांची फसवणुक आहे. प्रवाशांना खुप मनस्ताप सहन करावा लागला. याबाबत एसटी प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे.
- यशश्री रानडे, प्रवासी