ACB action | पुण्यात विधी सल्लागारासह दोघे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 11:44 AM2023-02-15T11:44:22+5:302023-02-15T11:45:24+5:30
४० हजार रुपयांची लाच मागणारा विधी सल्लागार व सहायक विधी अधिकारी अटकेत....
पुणे : नवीन इमारतीमधील विजेच्या मीटरबाबत घेतलेल्या हरकतीवर अनुकूल अहवाल देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागणारा विधी सल्लागार व सहायक विधी अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. विधी सल्लागार सत्यजीत विक्रम पवार (रास्ता पेठ कार्यालय) आणि सहायक विधी अधिकारी समीर रामनाथ चव्हाण (गणेशखिंड महावितरण कार्यालय) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या कारणासाठी लाच घेतली जात असल्याचे प्रथमच उघड झाले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची अशी पहिलीच कारवाई आहे.
याबाबतची माहिती अशी, पिंपरी गावातील जमीन एका बांधकाम व्यावसायिकाने विकसित केली होती. इमारत बांधून झाल्यानंतर जागा मालक व बांधकाम व्यावसायिक यांच्यात आर्थिक वाद झाला. बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्या नवीन इमारतींमध्ये इलेक्ट्रिक मीटर घेण्यासाठी अर्ज केला होता. जागा मालकाने त्यातील ११ इलेक्ट्रिक मीटर्स घेण्यावर हरकत घेतली होती. कायदेशीर वाद निर्माण झाल्याने महावितरणच्या गणेशखिंड विभागातील सहायक विधी अधिकारी समीर चव्हाण यांच्याकडे हे प्रकरण पाठविण्यात आले. त्यांनी ते रास्ता पेठ कार्यालयात सत्यजीत पवार यांच्याकडे पाठविले होते.
या दोघांनी त्या हरकतीवर अनुकूल अहवाल देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १८ व १९ जानेवारीला पडताळणी केली. त्यात दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी रास्ता पेठ येथील महावितरणच्या कार्यालयात लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोघांना पकडले. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली असून, पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करीत आहेत.