पूजा खेडकर यांच्या वडिलांची एसीबीकडूनही होणार चौकशी; उत्पन्न कोटींमध्ये असतानाही त्यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 06:22 AM2024-07-18T06:22:36+5:302024-07-18T06:23:13+5:30
दिलीप खेडकर हे क्लास वन अधिकारी असतानाही पूजा यांनी ओबीसी कोट्यातून प्रवेश घेताना नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट सादर केले असल्याचे समोर आले आहे.
पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची प्राप्तिकर विभागापाठोपाठ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही (एसीबी) चौकशी करण्यात येत आहे.
दिलीप खेडकर हे क्लास वन अधिकारी असतानाही पूजा यांनी ओबीसी कोट्यातून प्रवेश घेताना नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट सादर केले असल्याचे समोर आले आहे. दिलीप खेडकर यांचे उत्पन्न कोटींमध्ये असतानाही त्यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले? असा सवाल उपस्थित झाल्यानंतर ही चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने होणार चौकशी
nदिलीप खेडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात अधिकारी होते.
nलोकसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रात ४० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते.
nयाच अनुषंगाने चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तक्रार पुण्यात वर्ग
पूजा यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात मानसिक छळ केल्याप्रकरणी वाशिम पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ही तक्रार आता पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.
पालिकेच्या नोटीसनंतर पूजा खेडकरच्या आईने स्वत:हून हटविले अनधिकृत बांधकाम
पूजा खेडकर यांच्या आईने बाणेर येथील रो हाउसच्या सीमा भिंतीला लागून असलेल्या फुटपाथवर केलेले तीन फूट रुंद, दोन फूट उंची व साठ फूट लांबीचे अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटवले. पुणे महापालिकेने या घरावर नोटीस चिकटवली होती.
पूजा खेडकर यांनी दिलेल्या रहिवासी पत्त्यावर बंद कंपनी!
पिंपरी (पुणे) : पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांनी शहरातील तळवडे येथील रहिवासी पुरावा दिला. मात्र, तेथे कोणतेही रहिवासी क्षेत्र नसून बंद पडलेली औद्योगिक कंपनी आहे. त्या जागेवर थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी असून, तिचा फलकही हटविण्यात आला आहे. ही मालमत्ता म. दि. खेडकर म्हणजेच पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे आहे. ही कंपनी सद्य:स्थितीत बंद आहे.